MaharashtraNewsUpdate : ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार , भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल : देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला आरक्षण देताना , ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार! भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन काढल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि , मला दुसरं आश्चर्य हे वाटतं की सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत आहेत. सरकारमधल्या मंत्र्यांना सरकारविरोधात मोर्चे काढण्याचा अधिकार नाही. बाहेर मोर्चे काढून लोकांना भरकटवलं जातं आहे. त्यापेक्षा मंत्रिमंडळात ठराव आणा की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असा ठराव तरी मान्य करा.
भाजपाच्या ओबीसी कार्यकरिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच पाहिजे यात काहीही शंका नाही. मात्र ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही असं म्हणत ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही याबद्दलचं कलम टाकलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं. मात्र ओबीसी आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.