MarathwadaNewsUpdate : शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन -पाकिस्तानचा हात ,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !!

एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन थांबवावे म्हणून प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील आणि सरकारमधील नेते आंदोलकांच्या विरोधात मनमानी वक्तव्य करीत आहेत. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही अशीच मुताफळं उधळली असून त्यांनी , केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशाची राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. राजधानी दिल्लीत गेल्या १३ दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.
दानवे यांनी म्हटलं आहे कि , ‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला. ‘हा बाहेरच्या देशानं रचलेला कट आहे. शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे.’
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर व भाजपचे स्थानिक नेते केशव घोळके यांनीही शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन आणि पाकिस्तानसोबत जोडला होता. तसंच, शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानमधून फंडिंग होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उद्देशून ” कितीही मदत करा , रडतातच साले …” असे बोलल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.