MaharashtraNewsUpdate : माजी आदिवासी विकास मंत्री व भाजप नेते विष्णू सावरा यांचे निधन

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व भाजप नेते विष्णू सावरा यांचे आज मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. विष्णू सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या विकाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना उपचारासाठी कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. विष्णू सावरा यांच्यावर वाडा येथे उद्या (गुरुवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विष्णू सावरा यांचे आदिवासी विकासात मोठे योगदान राहिले आहे. पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. ते तब्बल सहा वेळा विधानसभेवर निवडून आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आदिवासी विकास मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्याआधी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्येही शेवटचे सहा महिने सावरा आदिवासी विकास मंत्री राहिले होते. विष्णू सावरा यांचा जन्म १ जून १९५० चा. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सहभाग घेतला. १९८० मध्ये बँकेची नोकरी सोडून ते राजकारणात आले. १९८० आणि १९८५ मध्ये वाडा मतदारसंघातून ते लढले पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र त्यांनी विजयाचा धडाका लावला. विधानसभेत सुरुवातीला त्यांनी भाजपकडून वाडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मतदारसंघांच्या पुनर्ररचनेत विक्रमगड मतदारसंघ अस्तित्वात आला आणि तिथूनही २०१४ मध्ये त्यांनी विजय मिळवला होता.