AhmadNagarNewsUpdate : रेखा जरे खून प्रकरण : मुख्य आरोपी बाळ बोठेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

अहमदनगर नगर जिल्ह्यातील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता शुक्रवारी दि . ११ डिसेंबर सुनावणी होणार आहे. आरोपीतर्फे सादर करण्यात आलेल्या अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागवले आहे. दरम्यान, आरोपीतर्फे तात्पुरत्या जामिनाचीही मागणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे अर्ज दाखल झाल्यानंतरही बोठेला कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी केली आहे.
या प्रकरणात बोठे याच्या वतीने अॅड. महेश तवले यांनी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज दुपारी सुनावणी झाली. अॅड. तवले यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने यावर सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यावर पुढील सुनावणी आता ११ डिसेंबरला होणार आहे. अशा प्रकरणांत शक्यतो आरोपीकडून तात्पुरत्या जामीनाची मागणी केली जाते. मात्र, यामध्ये अशी मागणी करणे टाळले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी दोन्ही बाजू ऐकूनच न्यायालयाचा निर्णय होणार आहे.