MaharashtraNewsUpdate : पालघर साधू हत्याकांड प्रकरण : ४७ आरोपींना न्यायालयाकडून जामीन

महाराष्ट्रातील पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील ४७ आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरोडेखोर समजून दोन साधूंची हत्या पालघरमध्ये करण्यात आली होती. आज या प्रकरणातल्या ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर ४७ जणांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणातल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पालघर येथे दोन साधूंची हत्या समूहाने केलेल्या मारहाणीत झाली होती. याप्रकरणात पोलिसांनी २०० लोकांना अटक केली होती. त्यापैकी आजवर १०५ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या १६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकाची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली असून ११ अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तसंच पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत करण्यात आला होता.
दरम्यान दोन साधूंना दरोडेखोर समजून लोकांच्या जमावाने ठार केले. पोलिसांनी या प्रकरणात ८०० पेक्षा जास्त जणांची चौकशी केली तर ११८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. या प्रकरणावरुन भाजपाने राज्य सरकारवर चांगलीच टीका केली होती. हे प्रकरण सीबीआयकडेही सोपवण्याची मागणी करण्यात आली होती.