AurangabadNewsUpdate : एसआरपीच्या जवानाकडून सुपर स्पेशलिटी रुग्णालयाची तोडफोड

कावीळ वार्डात दाखल केल्यानंतर गोंधळ घालून काचा फोडल्या
औरंगाबाद : कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर कावीळच्या आजारावर उपचार करण्यासाठी वार्डात दाखल केलेल्या राज्य राखीव दलातील पोलिसाने घाटीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली. ही घटना रविवारी घडली. या घटनेनंतर घाटी प्रशासनाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला. मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आला नव्हता.
जालना राज्य राखीव दलातील ३४ वर्षीय कर्मचारी संजयनगर भागात राहतो. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणे असल्याने २७ नोव्हेंबर रोजी तपासणीसाठी घाटीत दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला ४ डिसेंबर रोजी उपचारासाठी घाटीच्या वार्ड क्रमांक ३१ मध्ये दाखल केले. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्याचा कोरोनासह कावीळ असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे त्याला वार्ड क्रमांक आठमध्ये दाखल केले. अचानक गोंधळ सुरू झाल्याने वार्डातील कर्मचारी भयभीत झाले. तो सातत्याने मला काहीच झालेले नाही अशी बडबड करत होता. त्यामुळे त्याच्यावर सायकॅट्रीक विभागातील डॉक्टरांनी देखील आता उपचार सुरु केले आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बेगमपुरा पोलिसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.