IndiaWorldNewsUpdate : शेतकरी आंदोलनाला ब्रिटनमधील ३६ खासदारांचा पाठिंबा , ब्रिटिश सरकारकडे केल्या या मागण्या

मोदी सरकारच्या नव्या तीन कृषी बिलांच्या विरोधात भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ब्रिटनमधील ३६ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. तिथल्या लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंग धेसी यांच्या नेतृत्वाखाली ३६ ब्रिटिश खासदारांनी युकेचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे. खासदारांच्या गटाने रॉब यांना म्हटलं की, त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परराष्ट्र मंत्रालय आणि युकेच्या कार्यालयांमार्फत भारत सरकारशी चर्चा करावी.
या बाबत तनमनजीत सिंग यांनी म्हटले आहे कि, “गेल्या महिन्यात अनेक खासदारांनी आपल्याला तसेच लंडनमधील भारतीय उच्चायोगाला भारतातील शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या तीन कृषी कायद्यांबाबत लिहिलं होतं. केंद्र सरकारने करोनाच्या काळात आणलेले हे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्या पीकांना योग्य मोबदला देण्यास अपयशी ठरल्याबद्दल देशभरात व्यापक स्वरुपात शेतकरी निषेध आंदोलन करत आहेत. हा विषय ब्रिटनमधील शीख आणि पंजाबशी निगडीत असलेल्या लोकांसाठी विशेष चिंतेचा विषय आहे. हा कायदा भारतातील इतर राज्यांसाठीही अडचणीचा ठरत आहे. अनेक ब्रिटिश शीख आणि पंजाबी लोकांनी आपल्या खासदारांसोबत या प्रकरणी आवाज उठवला आहे. कारण पंजाबमधील त्यांच्या कुटुंबीयांना याची झळ बसणार आहे.
दरम्यान या कायद्यांविरोधात २८ नोव्हेंबर २०२० रोजी तनमजीत सिंग यांनी ऑल पार्टी पार्लिमेंटरी ग्रुप फॉर ब्रिटिश शीख यांची ऑनलाईन बैठक बोलावली होती. यामध्ये १४ खासदाारांनी सहभाग घेतला. तसेच ६० खासदारांनी सहभागी होऊ शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या बैठकीत ब्रिटिश सरकारने भारताशी चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना ज्या ब्रिटिश खासदारांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये डेबी अब्राहम, मार्टिन डॉकर्टी ह्युजेस, एलन डोरांस, अँड्रूयू ग्वेने, अफजल खान, इयान लावेरी, इमा लावेरी, क्लाइव लेविस, टोनी लॉयड, खालिद महमूद, सीमा मल्होत्रा, स्टीव मैककेब, डॉन मैकडोनेल, पॅट मैकफेडेन, ग्राहम मोरिस, कार्लेइन नौर्स आदींचा समावेश आहे.