IndiaNewsUpdate : नव्या कृषी बिलांच्या विरोधात आंदोलन चालूच , आज अमित शहा -कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात बैठक

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर बुधवारी शेतकर्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली . दरम्यान शनिवारी ५ डिसेंबरला मोदी सरकार आणि कॉर्पोरेट घराण्यांविरोधात देशव्यापी निदर्शनं करण्यात येतील, अशी माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी यावेळी दिली. दरम्यान आज सकाळी ९.३० वाजता या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात बैठक होणार आहे.
यावेळी बोलताना भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष स्वराज सिंह म्हणाले कि , आम्ही रस्त्यावर बसलेलो नाही. बॅरिकेड्स आणि पोलीस उभे करून प्रशासनाने आमचा रस्ता रोखला आहे आणि म्हणूनच आम्ही येथे थांबलो. हि जागा आम्हाला एखाद्या तात्पुरत्या तुरुंगासारखी वाटत आहे आणि आम्हाला रोखणं हे ताब्यात घेण्यासारखं आहे. इथून सुटताच आम्ही थेट दिल्लीला जाऊ.
दरम्यान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं मन वळवण्यात अपयशी ठरलेल्या कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या घरी भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी मंगळवारी शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती शहा यांना दिली. दरम्यान, केंद्र सरकार गुरुवारी शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा करणार आहे. पण त्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात बैठक होणार आहे. उद्या सकाळी ९.३० वाजता हि बैठक होणार आहे. तर सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये उद्या चौथी बैठक होत आहे. दिल्लीत मंगळवारी ३५ शेतकरी संघटनांची सरकारबरोबर ३ तास बैठक चालली. पण ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीला कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश उपस्थित होते. या बैठकीत सरकारने कायद्यांच्या माहिती देत शेतकऱ्यांचे फायदे सांगितले. पण शेतकरी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत.