MaharashtraNewsUpdate : राज्यातील सत्ता स्थापनेबद्दल फडणवीसांनी पुन्हा एकदा केले “हे” वक्तव्य ….

महाविकास आघाडीचे राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे, असे विधान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नव्या सरकारसाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. पंढरपूर येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि , असले सरकार चालत नसते, असे सांगताना आम्हाला कोणतीही घाई नाही. तुम्ही फक्त वाट बघा. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर आज छापे टाकले. सरनाईक यांचे पुत्र विहंग यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ‘ईडी ही तपास यंत्रणा एका राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करत आहे. ज्यांच्या आदेशावर ईडी कारवाई करत आहे, त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी त्यांच्याकडे पाठवून देतो. त्यांच्यावर कारवाई करून दाखवा,’ असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. त्यावर फडणवीस यांनी पलटवार केला.
खालच्या पातळीवर जाऊन आम्हालाही बोलता येते
संजय राऊत यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन आम्हाला बोलता येते. ते वापरतात त्यापेक्षा वाईट शब्द आम्ही वापरू शकतो, मात्र आमची ती संस्कृती नाही, असे सांगताना जी कारवाई होत आहे त्याच्या केवळ भीतीपोटी राऊत बोलत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केलीच तर कोर्ट सोडेल का?, असा सवालही फडणवीस यांनी केला. चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यावर काय होते हे अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टात पाहायला मिळाले आहे, असेही फडणवीस म्हणाले. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचे एकतरी प्रकरण दाखवा, असे आव्हान देताना असा गैरवापर केला असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती, असे फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान अथवा केंद्रीय गृहमंत्री कधीही या संस्थांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, असेही फडणवीस यांनी नमूद केले.