PuneEducationUpdate : मुंबई पाठोपाठ पुण्यातील शाळा बंदचा महापौरांनी जाहीर केला निर्णय

राज्य शासनाच्या अनलॉक प्रक्रियेअंतर्गत सोमवारपासून शाळा सुरु करण्याच्या ऐच्छिक सूचना देण्यात आल्यानंतर पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भातले आदेश दिले आहे. १३ डिसेंबरला पुण्यातली करोनाची स्थिती पाहणार त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणार. पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत असंही स्पष्ट केले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना संसर्ग आणखी वाढू नये म्हणून १३ डिसेंबरपर्यंत पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसेंदिवस कमी होत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या आता पुन्हा वाढताना दिसत आहे. मुंबईतही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातल्याही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पुण्यातल्या शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात आणि देशात गेल्या काही दिवसांमध्ये अनलॉक सुरु झाल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसू लागली. पुन्हा दिवाळीनिमित्ताने बाजारांमध्ये मोठी गर्दी झाली होती. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा आता सुरु झाली आहे . त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा बसावा , विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून जिल्हास्तरावर तूर्तास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, मुंबई आणि ठाणे या ठिकाणी असलेल्या शाळा बंद राहणार आहेत. २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याचे आदेश सरकारने दिले असले तरीही स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असंही या आदेशांमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता या तीन प्रमुख शहरांमधल्या शाळा पूर्णतः बंद असणार आहेत.