MaharashtraNewsUpdate : मोक्षप्राप्तीच्या नादात तीन तरुणांनी स्वतःच मृत्यूला कवटाळले

अघोरी विद्या प्राप्त करून अमरत्त्व मिळवण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी तीन तरुणांनी आपल्या मृत्यूला कवटाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील चांदा गावातील मामा भाचे व शहापूर येथील एका विवाहित तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे. तिघांनी गावापासून जवळच्या जंगलात जाऊन एका झाडाला साडीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी प्राथिमिक माहिती समोर आली आहे. हे सर्व जण एकमेकांचे नातेवाईक आहेत.
या बाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, १४ नोव्हेंबरला म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या अमावस्येला रात्री ११ च्या सुमारास नितीन भेरे (वय-३५, रा. शहापूर), महेंद्र दुभेले (वय-३०, रा.चांदा, खर्डी) व मुकेश घावट (वय-२२, रा.चांदा, खर्डी) हे तिघे बेपत्ता झाले होते. त्यानंतर शोधा शोध सुरु असताना या तिघांचे मृतदेह जंगलातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले
दरम्यान तिघांचे मृतदेह ज्या पद्धतीने आढळलेत आणि आधीपासून या तिघांबाबत परिसरात वेगळीच चर्चा होती. त्यानुसार एक तर लक्ष्मीपूजन अमावस्येच्या रात्री मोक्षप्राप्तीसाठी म्हणजेच अमरत्व मिळवण्यास तिघांनी आत्महत्या केली असावी किंवा यांनी कोणाला तरी मुक्ती मिळवून देण्याचे सांगितले होते. पण ते न झाल्याने या तिघांची कोणीतरी हत्या केली असावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हत्या की आत्महत्या याचा शहापूर पोलिस तपास करत आहेत.