MaharashtraNewsUpdate : कार्यक्रमाचे प्रमुख शरद पवार पण गाजले भाषण आशिष शेलार यांचे !! का ? ते तुम्ही पहा…

‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या ‘महाराष्ट्र टाइम्स’चे पत्रकार विजय चोरमारे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आज शरद पवार व आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी बोलताना भाजपनेते आमदार आशिष शेलार यांनी , एखादी कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे. तसं झालं तर माझ्यासारख्या माणसाचंही त्याला समर्थन असू शकतं. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर जाहीरपणे केल्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी पुस्तकातील स्त्री चरित्रांचा आढावा घेतला. ‘विद्वत्तेचा ठेका हा केवळ मुंबई-पुणेकरांनी घेतला आहे असा आपल्याकडं समज आहे. त्यामुळं साहजिकच बुलडाणा सारख्या परिसरातील विद्वान वा जाणकारांची नोंद अनेकदा घेतली जात नाही. ती या पुस्तकात घेण्यात आली आहे,’ याबद्दल शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी पुस्तकावर बोलताना जातिव्यवस्थेवर परखड भाष्य केले. आमदार आशिष शेलार यांनी पुस्तकाचा विषय आणि आशयाचे कौतुक केले.
आपल्या भाषणात पुढे बोलताना शेलार म्हणाले कि , चोरमारे यांच्या पुस्तकात शरद पवार यांच्या मातोश्री शारदाताई यांच्याबद्दलचेही लिखाण आहे. त्याबद्दल बोलताना शेलार यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. ‘मोठ्या पदावर अनेक नेते बसलेले आहेत. पवारसाहेबांची तुलना कुणाशीही करायची नाही. पण मोठ्या मनाचे मोठे नेते खूप कमी असतात, अशा या नेत्याच्या जननीबद्दल जे काही लिहिलं गेलेलं आहे, ते देखील संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारं आहे. योग्य दिशादर्शन करणारं हे पुस्तक आहे,’ असं शेलार म्हणाले. मुंबई विद्यापीठातून या विषयावर कुणीतरी पीएचडी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.