CoronaWorldUpdate : बाप रे !! अमेरिकेत एकाच दिवशी दोन हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू तर ८० हजार जणांना नवे रुग्ण आढळले !!

जगभर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचा दावा करण्यात येत असतानाच अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाने सुरुवात केली आहे. गुरुवारी अमेरिकेत एकाच दिवसात दोन हजार कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. मे महिन्यानंतर ही आतापर्यंतची सर्वाधिक मृतांची संख्या असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. येणारे काही आठवडे अमेरिकेसाठी अधिक चिंताजनक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूशनने जानेवारी महिन्याच्या मध्यापासून दररोज सरासरी २५०० बाधितांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर, १८ डिसेंबरनंतर दररोज २३०० अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यापर्यंत चार लाख ७१ हजारजणांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी अमेरिकेत ८० हजार ६०० करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपलब्ध आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत २ लाख ५० हजार ५३७ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून, रुग्णांची संख्या १.१५ कोटींहून अधिक आहे. जगभरातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वाधिक असल्याचे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. बुधवारी एका दिवसात एक लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळले.