EducationNewsUpdate : शाळा सुरु होत असल्या तरी विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरु होण्यात हि आहे मुख्य अडचण

कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित झालेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी देशातील शिक्षण व्यवस्था रुळावर येणे अद्याप कठीणच असल्याचे चित्र आहे. देशातील अनेक राज्यात काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत काही राज्यात सुरु होत आहेत मात्र देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालये मात्र केंव्हा सुरु होतील ? हे सांगणे कठीण आहे . कारण नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेली मुदत राज्यातील बहुतांशी विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी चुकवली आहे.
विशेष म्हणजे तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा, निकाल ही प्रक्रिया संपवून प्रथम वर्षांचे नवे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केला होता. अपवादात्मक परिस्थितीत १ नोव्हेंबरपासून नवे वर्ष सुरू करता न आल्यास १८ नोव्हेंबरपासून नवे वर्ष सुरू करण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रथम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष बुधवारपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांनी दिलेली हि तारीखही चुकवली आहे.
मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश अद्यापही पूर्ण झालेले नाही. काही विभागांची प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची आहे. महाविद्यालयाच्या स्तरावरही प्रवेश सुरू आहेत. मुळातच अनेक विद्यापीठांमध्ये परीक्षांच्या नियोजनात गोंधळ झाल्यामुळे परीक्षा आणि निकालाची प्रक्रिया लांबली. याशिवाय प्रवेश नियमन प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या विधि, शिक्षणशास्त्र यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे निकालच जाहीर झालेले नाहीत. सध्या विद्यापीठांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया करण्याची सूचना महाविद्यालयांना दिली असली तरी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत महाविद्यालये संभ्रमात आहेत. त्यामुळेही प्रवेश प्रक्रिया लांबली आहे.