BiharPoliticalNewsUpdate : सरकार स्थापनेसाठी एनडीएची बैठक , नितीशकुमार यांचे तळ्यात मळ्यात , उपमुख्यामंत्रीपदासाठी मात्र स्पर्धा

बिहारमध्ये हाती आलेल्या निकालानंतर आता सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत एनडीएकडे स्पष्ट बहुमत असले तरीही सत्ता स्थापन होईपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये धाकधुक वाढली आहे. एनडीएने आज बैठकीचे आयोजन केले आहे. आज पाटन्यात भाजपच्या मुख्य कार्यालयात एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे.
या बैठकीत विधानसभेच्या गट नेतेपदाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर एनडीएचे सर्व घटकपक्ष राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. दरम्यान १६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात असली तरी नितीशकुमार यांनी आपला मुख्यमंत्रीपदावर दावा नसल्याचे आधीच स्पष्ट केल्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री कोण बनणार हे अनिश्चित असले तरी या बैठकीपूर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेम कुमार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी आपला दावा दाखल केला आहे. प्रेमकुमार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरच्या या दाव्यानं भाजपमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या ५० वर्षापासून आपण पक्षाची सेवा करत असल्याचं सांगत प्रेम कुमार यांनी हा दावा केला आहे. सोबतच पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास तयार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
प्रेमकुमार हे सलग आठव्यांदा गया विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत. मागच्या सरकारमध्ये प्रेमकुमार यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी हाताळली होती. उल्लेखनीय म्हणजे, भाजपमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. प्रेमकुमार यांच्यासोबत अनेक दावेदारांनी उपमुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी जवळपास १३ वर्षांपासून बिहारमध्ये या पदाची जबाबदारी हाताळत आहेत. यंदाही तेच या पदाचे महत्त्वाचे दावेदार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी जवळचे संबंध आणि सामंजस्यामुळे त्यांची या पदासाठीची दावेदारी आणखीनच मजबूत झाली आहे.
याशिवाय संघाचे जुने नेते कामेश्वर चौपाल यांनाही आता उपमुख्यमंत्री पदासारख्या महत्त्वाच्या पदाची अपेक्षा आहे. कामेश्वर चौपाल अचानक पाटणामध्ये दाखल झाले. यावेळी, मीडियाशी बोलताना पक्ष जी जबाबदारी देणार त्याचा स्वीकार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. परंतु, त्यांची उपमुख्यमंत्री पदाची अपेक्षा मात्र लपून राहिलेली नाही. त्यामुळे आता, बिहारचा पुढचा उपमुख्यमंत्री कोण असेल? प्रेमकुमार, कामेश्वर चौपाल की सुशील कुमार मोदी हे एनडीच्या बैठकीनंतरच समजू शकेल.
How can someone become Chief Minister after getting 40 seats? People's mandate is against him, he is decimated & should decide on it. #Bihar will find its alternative, which will be spontaneous. It might take a week, ten days, or a month but it will happen: RJD leader Manoj Jha pic.twitter.com/SDaUMTc4AY
— ANI (@ANI) November 15, 2020
नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री कसे काय होऊ शकतात?
दरम्यान अवघ्या ४० जागा मिळालेल्या असताना त्या जोरावर नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री कसे काय होऊ शकतात? असा प्रश्न राजदचे नेते मनोजकुमार झा यांनी विचारला आहे.लोकांनी दिलेला कौल हा नितीशकुमार यांच्या विरोधात आहे. त्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बिहारची जनता लवकरच दुसरा पर्याय शोधू शकते. कदाचित आठवडाभरात, कदाचित दहा दिवसात किंवा कदाचित महिनाभरात बदल घडेल असंही झा यांनी म्हटलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात ‘बिहार धन्यवाद’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांकडेच राहील, असे संकेत दिले. त्यानंतर “जनता मालक आहे. त्यांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानतो,” असं नितीश कुमार यांनी ट्विट केलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार मनोज सिन्हा यांनी नितीश कुमार यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. “नितीश कुमार ४० जागा जिंकून मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहेत खरंच जनता मालक आहे” असे सिन्हा म्हणाले.