BiharPoliticalNewsUpdate : नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा , महाराष्ट्राची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपाला चिंता

Bihar CM and JD(U) leader Nitish Kumar (in file pic) tenders his resignation from the post to Governor Phagu Chauhan. #BiharElections pic.twitter.com/HqKvRD697c
— ANI (@ANI) November 13, 2020
निवडणूक निकालानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. यापूर्वी आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत दिवाळीनंतर आपला नवा नेता निवडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यापुढची बैठक १५ नोव्हेंबरला होणार आहे अशीही माहिती नितीश कुमार यांनी दिली.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल ११ नोव्हेंबरच्या पहाटे लागला. या निकालात एनडीएलाच बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या आहेत तर जदयूच्या जागा कमी झाल्या आहेत. तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी सातत्याने स्पष्ट केलं आहे. मात्र तरीही जेडीयूच्या जागा कमी झाल्याने नितीश कुमार हे नाराज आहेत. त्यामुळे त्यांची समजूत घालण्याचे काम भाजप नेते करीत आहेत . दरम्यान बिहारमध्येही महाराष्ट्राची पुनरावृत्ती झाली तर भाजपाला एक राज्य हातातून गमवावे लागेल अशी चिंता भाजपाला लागली आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या निकालात २४३ सदस्यांच्या विधानसभेत राष्ट्रीय जनता दलानं (RJD) ७५ जागांवर विजय मिळवलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपनं ७४ जागा आपल्या ताब्यात घेतल्यात. तर जेडीयूला ४३, काँग्रेसला १९, एलजेपी १ आणि इतरांना ३१ जागा मिळाल्यात. भाजप आणि नितीशकुमार यांच्या एनडीएकडे १२५ जागा आहेत. एनडीए मधील इतर दोन पक्षांना प्रत्येकी चार – चार जागा मिळाल्या आहेत. दरम्यान स्वतः नितीशकुमार यांनी ‘हा निर्णय एनडीएचे आमदार करतील. मी हा कधीही दावा केलेला नाही की राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मीच असेन’ असे म्हटले होते . त्यामुळे कमी जागा मिळाल्याने आणि प्रचाराच्या काळातील भाजप नेत्यांच्या भूमिकेमुळे नाराज असलेले नितीशकुमार एनडीएकडून सातव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास तयार होतील का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .