LatestUpdate : AmericaPresidentElection : डोनाल्ड ट्रम्प : 214 आणि जो बायडेन : 264 , बायडेनची आघाडी कायम

अत्यंत अटी तटीच्या सामन्यात अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात जोरदार लढत होत आहे . या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड राखले असले तरी निकाल फिरवू शकतील अशा मोजक्या राज्यांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २६४ , तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली होती. दरम्यान विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे.
उपल्बध माहितीनुसार बहुतेक राज्यांतील मतमोजणी झालेली असली किंवा कल स्पष्ट झालेले असले, तरी अॅरिझोना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशीगन, पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, अलास्का आणि मेन या ठिकाणी मतमोजणी सुरू होती. काही राज्यांमध्ये टपाली मते आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये झालेले मतदान मोठय़ा प्रमाणावर असून ती मतमोजणी निकाल फिरवणारी ठरू शकते. अॅरिझोना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशीगन आणि पेनसिल्वेनिया या राज्यांत मिळून ६३ प्रातिनिधिक मते मिळवून २७०चा आकडा गाठण्याचा बायडेन यांचा प्रयत्न आहे. जॉर्जिया राज्यात बायडेन यांनी अनपेक्षित यश मिळवले असून, येथे १६ प्रातिनिधिक मते आहेत. बायडेन यांनी पेनसिल्वेनिया राज्यात विशेष जोर लावला होता, परंतु तेथे रात्री उशिरापर्यंत ट्रम्प आघाडीवर होते.
कोरोना आणि अर्थ व्यवस्थेला मतदान
दरम्यान सिनेट आणि प्रतिनिधिगृहासाठी झालेल्या समांतर निवडणुकीत अनुक्रमे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या जागा कमी होतील, अशी चिन्हे आहेत. येथेही मतदारांनी संमिश्र कौल दिलेला दिसून येतो. मतदारांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्दय़ावर ट्रम्प यांच्या बाजूने तर कोरोना साथीच्या मुद्दय़ावर बायडेन यांच्या बाजूने कौल दिला आहे. आधी झालेले दहा कोटी मतदान यात निर्णायक आहे कारण त्यात बरीच मते बायडेन यांना मिळाल्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी बुधवारी असा दावा केला, की अमेरिकी लोकांवर हा निवडणूक घोटाळा लादण्यात आला असून आपण ही निवडणूक आता न्यायालयातच लढू. वॉशिंग्टन स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे २ वाजता आपण निवडणूक जिंकल्याचा दावा करून त्यांनी साऱ्यांनाच बुचकळ्यात पाडले.
आधी मतदान झालेली मते पहाटे चारच्या सुमारास मतदान मोजणी प्रक्रियेत सामील करण्याची ट्रम्प यांची अपेक्षा होती, पण ३ कोटींहून अधिक टपाली मते व आधीच झालेले एकूण १० कोटी मतदान यामुळे हे सगळे जवळपास अशक्य होते. त्यामुळे टपाल सेवेने लगेच ही मते मोजणी प्रक्रियेत आणण्याबाबत असमर्थता दाखवली. ट्रम्प म्हणाले, की देशासाठी ही वेदनादायी बाब असून आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो व जिंकलीच आहे. लोकांनी जो पाठिंबा दिला त्याबाबत त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आपण आपल्या समर्थकांसह विजय साजरा करू असे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांना चार, तर बायडेन यांना तीन राज्यात विजय महत्त्वाचा
जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वेनिया व विस्कॉन्सिन या राज्यातील लढती विजयासाठी महत्त्वाच्या असताना ट्रम्प यांना चार, तर बायडेन यांना तीन राज्यात विजय महत्त्वाचा आहे. नेवाडा व विस्कॉन्सिनमध्ये सुरुवातीला बायडेन आघाडीवर होते तर जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वेनिया व मिशिगन येथे ट्रम्प यांची थोडी आघाडी होती. ट्रम्प यांना जिंकण्यासाठी पेनसिल्वेनियाची गरज असून ते तेथे जिंकले व इतर तीन ठिकाणी विजय मिळवला तर ते २७० चा आकडा गाठू शकतात. त्यांना पेनसिल्वेनिया जिंकता आले नाही तर इतर पाच राज्ये जिंकावी लागतील. ट्रम्प यांना पेनसिल्वेनियात ७५ टक्के मोजणीवेळी ५५ टक्के मते मिळाली तर बायडेन यांना ४३ टक्के मते मिळाली.
बायडेन यांनाजिंकण्यासाठी नेवाडा व विस्कॉन्सिन ही राज्ये जिंकावी लागतील. त्यांची तेथे बुधवारी थोडी आघाडी होती. त्या राज्यांशिवाय जॉर्जिया, मिशीगन व पेनसिल्वेनियात विजय मिळवला तर त्यांची अध्यक्षपदाची वाट सुकर होईल. ट्रम्प हे मिशिगनमध्ये ५१ टक्के विरुद्ध ४७ टक्के याप्रमाणे आघाडीवर होते. नेवाडात बायडेन ४९.३ टक्के तर ट्रम्प ४८.७ टक्के अशी स्थिती ८६ टक्के मतमोजणीत होती.
बायडेन यांचा विजयाच्या मार्गावर असल्याचा दावा
दरम्यान डेमोकेट्रिक उमेदवार बायडेन यांनी विजयाच्या मार्गावर असल्याचा दावा केला असून त्यांचे सगळे लक्ष अटीतटीच्या राज्यांवर आहे. आपणच विजयी होणार आहोत असा विश्वास त्यांनी डेलावेर येथे व्यक्त केला. मतमोजणी लगेच संपणार नाही, त्याला बराच वेळ लागेल. कदाचित मतमोजणी उद्या सकाळपर्यंतही लांबू शकते. पण आम्ही जिंकू. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, मॅसॅच्युसेटस, वॉशिंग्टन, मेरीलँड या बालेकिल्ले जिंकताना अॅरिझोना या रिपब्लिकनांच्या भरवशाच्या राज्यात बायडेन यांनी खिंडार पाडले आहे. बायडेन यांनी सांगितले,की टपाली व इतर मते अजून बाकी आहेत. निकाल बदलू शकतात, प्रत्येक मताला महत्त्व असते. अॅरिझोनात आम्ही जिंकू, विस्कॉन्सिन व मिशिगनमध्येही चांगली स्थिती आहे. थोडा वेळ लागेल पण पेनसिल्वेनियातही आम्हीच जिंकू.
या धामधुमीत ट्रम्प यांनी, आम्ही जिंकत आहोत पण त्यांनी निवडणूक ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. मतदानाच्या वेळेनंतर त्यांना मतदान करू देणार नाही, असे ट्वीट केले होते, पण ट्विटरने त्यांचा तो संदेश लपवला. नंतर या निवडणुका दिशाभूल करणाऱ्या आहेत असे मोघम वाक्य संदेशात टाकण्यात आले. दरम्यान आता निर्णायक राज्यांमध्ये १. नेवाडा, २. अॅरिझोना, ३. विस्कॉन्सिन, ४. मिशीगन, ५. पेनसिल्वेनिया, ६. नॉर्थ कॅरोलिना, ७. जॉर्जिया यांचा समावेश असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.