IndiaCoronaEffectUpdates : ज्या राज्यांनी शाळा सुरु केल्या तेथे कोरोनाची अवस्था अशी आहे ….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्व राज्यात अनलॉक प्रक्रिया चालू असताना केंद्र सरकारने ५० टक्के क्षमतेने परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्राने जरी अद्याप शाळा महाविद्यालये उघडली नसली तरी ज्या राज्यांनी आपल्या राज्यात शाळा सुरु केल्या त्या राज्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाबाधित झाले असल्याचे वृत्त आहे . हाती आलेल्या वृत्तानुसार आंध्र प्रदेशमध्ये प्रत्यक्ष शाळा उघडल्यानंतर तब्बल २६२ विद्यार्थ्यांना आणि १६० शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या राज्यात एक दिवसाआड शाळा सुरु करण्यात आल्या आहेत . एकूण उपस्थिती लक्षात घेता कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आंध्रच्या शिक्षण आयुक्तांनी म्हटले आहे.
या माहितीनुसार आंध्र प्रदेशमध्ये २ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रत्यक्ष भरण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून गेल्या तीन दिवसांत २६२ विद्यार्थ्यांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. ‘मात्र ही आकडेवारी खबरदारीची नव्हे कारण जितक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहात आहेत, त्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी आहे. तरीही कोविड-१९ सुरक्षेसंदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत,’ असे आंध्रचे शालेय शिक्षण आयुक्त व्ही. चिन्ना वीरभद्रुदू म्हणाले. बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली. २६२ विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली. मात्र, हे प्रमाण ०.१ टक्का इतकं देखील नाही. म्हणूनच ही मुलं शाळा उघडल्यामुळे बाधित झाली असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक शाळेच्या वर्गात केवळ १५ ते १६ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ९.७५ लाख विद्यार्थ्यांनी नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी नोंदणी केली. यापैकी ३.९३ लाख विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती लावली. यातील १.११ लाख शिक्षक होते. १.११ लाख शिक्षकांपैकी १६० करोना पॉझिटिव्ह झाले. विद्यार्थी आणि शिक्षक दोहोंचे आयुष्य आमच्यासाठी मोलाचे आहे. असं वीरभद्रुदु म्हणाले.
सोमवारपासून काही राज्यात सुरु झाल्या शाळा
दरम्यान देशातल्या काही राज्यांनी सोमवारपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आसाममध्ये प्राथमिक शाळा वगळता सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था उघडण्यात आल्या आहेत. या सर्व शिक्षण संस्था करोना व्हायरस महामारीमुळे गेले सात महिने बंद होत्या. आसामसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देखील सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आसाममधील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र सहावीपासून पुढील वर्ग प्रत्यक्ष उघडण्यात आले आहेत. तसेच राज्यातील कॉलेज, विद्यापीठे, पॉलिटेक्निक कॉलेज, खासगी संस्था आणि कोचिंग क्लासही उघडले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जात आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. ज्यांना शाळेत यायचे नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये दोन नोव्हेंबरपासून शाळा उघडल्या आहेत. मात्र केवळ दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाच शाळेत बोलावले आहे. बोर्डाच्या परीक्षांच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी त्यांना प्राधान्याने शाळेत बोलावले आहे. हिमाचल प्रदेशातही दोन नोव्हेंबर पासून शाळा उघडल्या आहेत. येथे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले आहे. कोविड-१९ च्या गाइडलाइन्सचे सक्तीने पालन करण्यास सांगितले आहे.
आंध्र प्रदेश सरकारनेदेखील दोन नोव्हेंबर पासून शाळा सुरू केल्या आहेत. मात्र येथे एक दिवसाआड शाळा सुरू राहणार आहेत. म्हणजेच महिन्यातील १५ दिवस शाळा बंद असतील. एका वेळी एका वर्गात केवळ १६ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी दिली गेली आहे. हरयाणा तसेच राज्यात कॉलेज आणि विद्यापीठे १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. ओडिशामध्ये देखील शाळा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तामिळनाडूत दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आहेत.
महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीनंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या जातील का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. शाळा उघडल्या तरी पालक मात्र अजूनही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास उत्सुक नसल्याचेच चित्र आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाइन्सनुसार, मुलांना शाळेत येण्यासाठी कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही. परिणामी शाळा उघडल्या तरी पालक मुलांना शाळेत पाठवणार का हा प्रश्न आहे.