IndiaCoronaNewsUpdate : राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्यक्त केली तिसऱ्या लाटेची शक्यता

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राजधानीत करोनाची तिसरी लाट सुरू असल्याचा खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अचानक कोरोनाबाधित संख्येत लक्षणित वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ५९,५४० नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ६ हजार ७२५ नमुने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. म्हणजेच जवळपास तब्बल ११.२९ टक्के नमुने करोना संक्रमित आढळले आहेत. त्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे.
केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील उपचार सुरु असलेल्या ६ हजार ७९८ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णांलयात भर्ती आहेत. ९७३ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ३५८ रुग्ण कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसेच २१ हजार ५२१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. राजधानी दिल्लीत दिवसेंदिवस तपमान कमी होताना दिसतंय. त्यातच सर्दी-खोकल्याच्या आजारासोबतच कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत दररोज जवळपास ५ हजारांच्या संख्येत रुग्ण आढळत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत ही संख्या १२ हजारांपर्यंत पोहचू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
दरम्यान राजधानी दिल्लीत आत्तापर्यंत एकूण ३ लाख ६० हजार ०६९ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली असून तर एकूण ६ हजार ६५२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. दिल्ली सरकारने खासगी रुग्णालयांना सोबत घेऊन कोविड नियंत्रणावर काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने बेड आणि व्हेन्टिलेटरची मागणी वाढत आहे. उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीत अद्यापही १५ हजार ७८० कोविड रिझर्व्ह बेड आहेत. जवळपास १३२ रुग्णालयांत कोविड उपचार सुरू आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांची संख्या मोठी आहे.