IndiaNewsUpdate : खासगी बँकांकडूनही जादा सेवेसाठी वसूल केले जाणार इतके शुल्क

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबरोबरच खासगी क्षेत्रातील बँका , आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या बँकांनीही ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. या बँकांनी दिलेल्या माहितीनुसार आता बँकेच्या वेळे व्यतिरिक्त आणि सुट्ट्यांच्या दिवशी कॅश रिसायकलर आणि कॅश डिपॉझिट मशिनमधून पैसे जमा करण्यासाठी ग्राहकांना या सेवेसाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. बँकेच्या नोटिफिकेशननुसारआयसीआयसीआय बँक सुट्ट्यांच्या दिवशी आणि कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ग्राहकांकडून सुविधा शुल्काच्या रुपात ५० रुपये घेईल.
सीएनबीसी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार बँकेने असे सांगितले आहे की, ज्येष्ठ नागरिक, बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट, जनधन खाती, विद्यार्थी खाती आणि दिव्यांग तसंच अंध व्यक्तीसाठी असणारी बँक खाती, या खात्यांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या अहवालानुसार जर तुम्ही एका महिन्यात एकाच ट्रान्झॅक्शनद्वारे किंवा एकापेक्षा अधिक ट्रान्सझॅक्शनद्वारे कॅश एक्सेप्टर/रिसायकलर मशिनमधून १० हजारांपेक्षा अधिक पैसे भरले, तरी देखील बँकांकडून त्यावर सुविधा शुल्क आकारले जाईल.
या वर्षाच्या सुरूवातीस, अॅक्सिस बँकेने बँकिंगच्या वेळेनंतर आणि राष्ट्रीय तसंच बँकेच्या सुट्यांच्या दिवशी रोख जमा व्यवहारावर ५० रुपये सुविधा शुल्क आकारण्यास सुरवात केली होती. सुविधा सुविधा १ ऑगस्टपासून लागू झाली. त्याचप्रमाणे बँकेतून ३ वेळा मोफत पैसे काढता येतील त्यानंतरच्या विड्रालवर १५० रुपये शुल्क आकारण्यात येईल, अशी देखील माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे एका महिन्यात तीन वेळा पैसे डिपॉझिट करणे मोफत असेल, त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ४० रुपये आकारले जातील.