IndiaNewsUpdate : ” या ” राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय , दिवाळीच्या फटाक्यांवर बंदीचे आदेश

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यंदा दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर संपूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंबंधी शासनाने अधिकाऱ्यांनाही निर्देश जारी केले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी तसंच रुग्णांच्या त्रासात आणखीन वाढ होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे कोविड १९ संक्रमित रुग्णांना हृदय आणि श्वासासंबंधी आणखीन अडथळे जाणवू शकतात. त्यामुळे, फटाक्यांच्या विक्रीवर आणि परवान्यांवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे कोविड १९ च्या रुग्णांसोबतच इतर लोकांनाही हृदय आणि श्वासासंबंधी अडथळे जाणवू शकतात. अशावेळी, लोकांनी दिवाळीत आतिषबाजीपासून लांब राहायला हवं. तसंच जनतेनं लग्न समारंभ आणि इतर सोहळ्यांतही आतिषबाजी बंद करायला हवी, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन यांसारख्या विकसित देशांत करोना संक्रमणाची दुसरी लाट दिसून येत आहे. त्यामुळे या देशांना दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. यातूनच धडा घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज मुख्यमंत्री गेहलोत यांनी व्यक्त केलीय. राज्यात डॉक्टरांकडूनही फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती.
दरम्यान कोरोना काळात प्रदूषण रोखण्यासाठी आणखी छोटे छोटे उपाय वापरात आणण्याचं आवाहनही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. फटाक्यांवर बंदीशिवाय, वाहन चालकांनी सिग्नलवर लाल बत्ती असेल तर इंजिन बंद करण्याचं आवाहन केलं आहे. वाहनांचं प्रदूषण फिटनेस सर्टिफिकेट तपासणी करण्याचे तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचेही निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राजस्थानात या अगोदर सोमवारपर्यंत शाळा उघडण्याचे देण्यात आलेले निर्देश मागे घेतानाच आता १६ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय जलतरण तलाव आणि सिनेमागृहदेखील ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील.