IndiaNewsUpdate : अखेर मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ ५० वर्षांसाठी अदानी समूहाला बहाल

अखेर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आज अदानी उद्योग समुहाकडे मंगळूरू विमानतळाचे भाडेतत्त्वावर ५० वर्षांसाठी हस्तांतरण केले आहे. या संदर्भात आज भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये अदानी समूहाने देशाच्या नागरी हवाई सेवाक्षेत्रात पदार्पण करताना सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले होते. समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले होते. या करारामुळे पुढील ५० वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असणार आहे.
दरम्यान लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्क अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ मधील फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानतळांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यानुसार आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अदानी समूहाला मंगळुरू विमानतळ ५० वर्षांसाठी भाडेतत्वावर दिले आहे.