HathrasGangRape : मोठी बातमी : हाथरस प्रकरणाचा सीबीआय तपास हाय कोर्टाच्या देखरेखीखाली , सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने हाथरस प्रकरणाबाबत आज महत्वाचा निर्णय दिला. या प्रकरणाचा सीबीआय करत असलेला तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासानंतरच हा खटला उत्तर प्रदेशातून दिल्लीला वर्ग करायचा की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआय हायकोर्टाला जबाबदार असेल, असे कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा खटला दिल्लीत चालवला जावा असा अर्ज पीडित कुटुंबाने सुप्रीम कोर्टात केला होता.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती रामासुब्रमणियव याच्या पीठाने एका जनहीत याचिकेवर, तसेच कार्यकर्ते आणि वकिलांनी दाखल केलेल्या इतर याचिकावरील आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबर या दिवशी राखून ठेवला होता. या प्रकरणावर उत्तर प्रदेशात निष्पक्ष सुनावणी होणे शक्य नाही कारण कथित रुपात हा तपासात ढवळाढवळ करण्यात आली आहे असे याचिकेत म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यात या तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान कुटुंबियांच्या संमतीशिवाय पोलिसांनी या तरुणीच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केले होते त्यामुळे यावरून संतापाची लाट उसळली होती.