MaharashtraCrimeUpdate : शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखावर झाडल्या गोळ्या, लोणावळ्यात एका पाठोपाठ दोन हत्या ,

लोणावळ्यातील शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सकाळी दहाच्या सुमारास लोणावळा शहरातील जयचंद चौक येथे घडली असून राहुल उमेश शेट्टी अस खून झालेल्या शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाचे नाव आहे. दरम्यान हनुमान टेकडी येथे गणेश नायडू नावाच्या व्यक्तीचाही डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून रात्री साडेनऊच्या सुमारास खून करण्यात आला. या प्रकरणी एकाला लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून शेट्टी खून प्रकरणी अज्ञात आरोपी हे फरार आहेत. या दोन्हीही खून प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार गोळ्या झाडून खून करण्यात आलेल्या राहुल उमेश शेट्टी यांचे शहरातील अनेक जणांशी पटत नसल्याने ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर, गणेश नायडू आणि शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल शेट्टी यांच्या खुनाचे धागेदोरे जुळतात का? याचा देखील शोध लोणावळा पोलीस घेत आहेत.
या खून प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राहुल उमेश शेट्टी यांची दोघा अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना लोणावळा शहरात घडली असून राहुल शेट्टी हे घराजवळील हॉटेलमध्ये चहा पीत बसले असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला असून लोणावळा पोलीस आरोपींचा शोध सुरु आहे. तर, दुसऱ्या घटनेत लोणावळ्यातील गणेश नायडू नावाच्या व्यक्तीचा दादागिरी करत असल्याचा कारणावरून खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल आहे. दरम्यान, दोन्ही खुनाच्या घटनांनी लोणावळा शहर हादरले असून पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान आहे.