IndiaNewsUpdate : न रही दाढी न गया जॉब !! अखेर ” त्या ” फौजदाराने दाढी काढली आणि तो ड्युटीवर पूर्ववत रुजू झाला…!!

देशभर गाजलेले उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचे दाढी प्रकरण आता संपुष्टात आले आहे. कारण या या पोलीस उपनिरीक्षकाने आता दाढी काढली असून, त्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण बागपतच्या रामला पोलिस ठाण्यात नियुक्त पोलीस उपनिरीक्षक इंतेसार अली आणि त्यांनी वाढवलेल्या दाढीशी संबंधित आहे. पोलीस उपनिरीक्षक इंतेसार अली यांना दाढी काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीन वेळा दाढी करण्याची सूचना केली. पण तरीही ते वाढवलेल्या दाढीत कर्तव्य बजावत राहिले. यामुळे बागपतच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना तात्काळ निलंबित केलं होतं.
देशभर या विषयावरून मोठी चर्चा सुरु झाली होती मात्र या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक इंतेसार अली हे दाढी करून पोलीस अधीक्षकांसमोर हजर झाले. त्यामुळे इंतेसार अली यांचं निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे. पोलिस उपनिरीक्षकावर केलेली विभागीय कारवाई ही केवळ पोलीस नियमावलीनुसारच केल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मॅन्युअल आणि नियमांनुसार, शिख वगळता कोणालाही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय दाढी वाढवण्याची परवानगी नाही. पोलिस विभागाचे कर्मचारी परवानगीशिवाय फक्त मिशा ठेवू शकतात. पण दाढी ठेवू शकत नाही. शिख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माच्या कर्मचाऱ्याला दाढी ठेवायची असल्यास विभागाची परवानगी घ्यावी लागेल. दरम्यान १० ऑक्टोबर १९८५ ला उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्क्युलर जारी केले होते. यानुसार मुस्लिम पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने दाढी ठेवू शकता, असं स्पष्ट करण्यात आलं. तसंच १९८७ च्या सर्क्युलरनुसार युपी पोलिसांना धार्मिक ओळख ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.