MaharashtraNewsUpdate : हृदयद्रावक : सततच्या वादाला कंटाळून माय-लेकीची सोबतच आत्महत्या

नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माय-लेकीने घरातील सततच्या वादाला कंटाळून अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली. सविता राजू खंगार (वय ४५) आणि रूचिता राजू खंगार (वय २०,रा. दोघी वाठोडा ले आउट, विद्यानगर) अशी या माय -लेकीची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले कि , सविता आणि तिची मुलगी रुचिता यांनी घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या दोघींना त्यांच्या कुटुंबीयांकडून विशेषत: सविताच्या सासरच्यांकडून त्रास होता, असे सांगितले जात आहे. या दोघी घरातील पंखा दुरुस्त करू न शकल्याने कुटुंबीयांनी त्यांचा छळ केल्याचे कळते व हीच घटना आत्महत्येमागील निमित्त ठरल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या घटनेमुळे सविता आणि त्यांची लहान मुलगी रुचिता या रागाच्या भरात घरातून निघाल्या. सविता यांची मोठी मुलगी श्वेतलसुद्धा त्यांच्या मागोमाग निघाली. श्वेतल त्यांना रस्त्यात समजाविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र या दोघींच्या रागाचा पारा इतका वाढला होता की त्या घरापासून तब्बल १० किलमीटरचे अंतर पायी पार करून अंबाझरी तलावाजवळ पोहोचल्या. श्वेतलने अनेकदा समजाविण्याच्या प्रयत्न करूनही या दोघींनी जलसमाधी घेतली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.