CrimeNewsUpdate : ‘हॅलो! पोलीस स्टेशन…मी एका बलात्कार करणाऱ्याला ठार केलं’ !! असे सांगून “तिने” “त्याचा” कायमचा किस्सा खतम केला…

बळजबरीच्या ब्लॅकमेलिंग आणि नकोशा झालेल्या शारीरिक संबंधाने त्रस्त झालेल्या एका महिलेनं आपल्यावर जबरदस्ती करणाऱ्या तरुणाचा कायमचा काटा काढून टाकला असल्याचे वृत्त आहे. या महिलेनं त्या व्यक्तीवर थेट एक दोन नाही तर २५ वेळा चाकूचे वार करून त्याचा खात्मा केला आणि स्वतःच पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती आणि गुन्ह्याची कबुली दिली. ही थरारक घटना मध्य प्रदेशातील गुना परिसरात घडली आहे. पोलिसांना हत्येची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २००५ पासून हा तरुण तिच्यावर सतत बलात्कार करत होता. त्यावेळी ही महिला अल्पवयीन होती. अखेर रागातून महिलेनं त्याला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला आणि तिने तसे करून स्वतःच पोलिसांना माहिती दिली . ब्रिज भूषण शर्मा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार १६ वर्षांची असल्यापासून ब्रिजभूषण शर्मानं तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर या युवकाने अनेक वेळा तिला धमकावून जबरदस्ती केली. अखेरीस त्या महिलेने एका शिक्षकाशी लग्न केले जेणेकरुन ब्रिजभूषण तिच्यापासून दूर जाईल. लग्नानंतर या महिलेला एक मुलगीही झाली पण तरीही ब्रिजभूषण तिची पाठ सोडायला तयार नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित महिलेला सतत धमक्या देऊन शर्मा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत राहिला. घटनेच्या रात्री ही महिला घरी एकटी होती, त्यावेळी नेहमीप्रमाणे ब्रिजभूषण तिच्या घरी आला. नशेत असलेल्या ब्रिजभूषणने पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा पीडितेचा संयम सुटला आणि तिने धारदार चाकूने त्याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल २५ वार केले. त्याचे प्राण जाईपर्यंत तिने त्याच्यावर वार करणे सुरूच ठेवले . आणि तो गतप्राण झाल्याची खात्री पटल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात फोन लावून ‘हॅलो! पोलीस स्टेशन…मी एका बलात्कार करणाऱ्याला ठार केलं’ अशी माहिती पोलिसांना दिली.