IndiaNewsUpdate : प्रसार भारतीच्या माध्यमातून सरकारचा दोन वृत्तसंस्थांवर निशाणा , राष्ट्र विरोधी वृत्त दिल्याचा ठपका

प्रसार भारतीने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) आणि युनायटेड न्यूज ऑफ इंजिया (UNI) या प्रसिद्ध वृत्तसंस्थांशी असलेले आपले व्यवसायिक संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसारभारती आता इतर देशी वृत्तसंस्थांकडून नवे प्रस्ताव मागवणार आहे. देशातील सर्वातमोठी वृत्तसंस्था असलेली पीटीआय एका बोर्डाद्वारे चालवली जाते. यामध्ये प्रमुख वर्तमानपत्रांच्या मालकांचा सहभाग असतो. पीटीआय ही ना नफा तत्वावार चालणारी ट्रस्ट आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसारित केले आहे. प्रसार भारतीचा हा निर्णय भारत-चीन संघर्षासंदर्भातील बातम्या प्रसारित करण्याबाबतच्या मुद्द्यावरून घेण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. प्रसार भारती हा पीटीआयच्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे. प्रसार भारती दरवर्षी पीटीआयला ६ कोटी ७५ एवढी रक्कम देत असते. या संदर्भात पीटीआय आणि यूएनआयला प्रसार भारतीने पत्र पाठवले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसार भारती लवकरच पीटीआय आणि यूएनआयसह सर्वच वृत्तसंस्थांकडून प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू करेल. या वर्षी जून महिन्यात वृत्तसंस्थांद्वारे कथित राष्ट्रविरोधी वृत्त प्रसारित केल्यामुळे हे संबंध संपुष्टात आणल्याचे सांगत प्रसार भारतीने हे पत्र धाडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीटीआयने चीनी राजदूत सून विडोंग यांती एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत विडोंग यांनी भारत-चीन तणावाला भारताला दोषी पकडले होते. भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० शूर जवान शहीद झाले होते. जूनमध्ये बोर्डाची बैठक होण्यापूर्वी पीटीआयला हे पत्र पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या पत्रात पीटीआयच्या कथित राष्ट्रविरोधी वृत्तांकनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पीटीआयचा संपादकीय दृष्टीकोन ठीक नसल्याचे प्रसार भारतीने पत्रात स्पष्ट कल्याचे समजते. प्रसार भारती पीटीआयला मोठी रक्कम देत असे आणि ही रक्कम कोटींमध्ये होती असा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे.