MaharashtraNewsUpdate : राज्यातील पूर परिस्थितीबद्दल पंतप्रधान -मुख्यमंत्री यांच्यात चर्चा , मदतीचे दिले आश्वासन

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं.@OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2020
मराठवाड्यात ओला दुष्काळ , कोकणसह सोलापूर , सांगली , कोल्हापूर जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे वृत्त असून पंढरपूर तर पूर्णतः जलमय झाले आहे . या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज फोनवरुन चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची माहिती पंतप्रधान मोदींनी घेतली. अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत चर्चा झाली असून आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींसोबत माझ्या सहवेदना आहेत. मदत आणि बचाव कार्यामध्ये केंद्र सरकार ठाकरे सरकारला सहकार्य करेल असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्विट करत ही माहिती दिली आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा मराठवाडा , कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे सांगली, सोलापुरातील खरीप पिके, भाजीपाल्यासह कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्याला बुधवारी संध्याकळनंतर झालेल्या तुफानी पावसाने मोठा तडाखा दिला. या दोन जिल्ह्यांच्या बहुतांश भागात शंभर मिलिमीटरच्या सरासरीने अतिवृष्टी झाली. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही नुकसान केले आहे. या पावसाने या भागातील नद्यांना पूर आले, शेत-शिवारात पाणी शिरले. या पूरस्थितीमुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
गेल्या चार दिवसांपासून चालू असलेल्या अतिवृष्टीचा भीमा नदीकाठच्या अकलूज, पंढरपूर, सांगोला आदी तालुक्यांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील १७ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बचावकार्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला. तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. रत्नागिरीत कापणीला आलेल्या सुमारे ३० टक्के भातशेतीचे नुकसान झाले.रायगडमध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला. वादळी पावसामुळे कापणीला आलेले पीक आडवे झाले. सोलापूर जिल्ह्यात ५६५ गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. दरम्यान याच सगळ्या परिस्थितीबाबत आणि त्यावर महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.