IndiaNewsUpdate : भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी या संताने सुरु केले उपोषण

तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांनी आता भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपले उपोषण संपणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलेली आहे. देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झालेली नाही तर फाळणीचे कोणते औचित्यच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशचे भारतात विलिनीकरण करून अखंड भारताची घोषणा केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. या पूर्वी परमहंस दास यांनी १ ऑक्टोबर, २०१८ पासून ते १२ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत राम मंदिरासाठी उपोषण केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ येथील पीजीआय येथे येऊन फळांचा रस पाजून परमहंस दास यांचे उपोषण तोडले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली, असे उपोषणाला बसलेल्या परमहंस दास यांनी म्हटले आहे. मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेश दिला गेला, मात्र हे दोन्ही समुदाय आजही देशात राहात आहेत. भारताला हिंदू राष्ट्र घोषित केले जावे या मागणीसाठी आपण सोमवारी सकाळपासूनच अन्न आणि पाण्याचा त्याग करत उपोषणाला बसलो आहोत, असे दास म्हणाले. जर आपली मागणी अनुचित असेल, तर मग देशाची फाळणी धर्माच्या आधारे का केली गेली?, हे स्पष्ट करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.