IndiaNewsUpdate : माजी गव्हर्नर आणि सीबीआयचे माजी संचालक अश्विन कुमार यांची आत्महत्या

Former Governor of Manipur and Nagaland, and Ex-CBI Director Ashwani Kumar found hanging at his residence in Shimla: Mohit Chawla, SP Shimla. #HimachalPradesh
— ANI (@ANI) October 7, 2020
मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर आणि सीबीआयचे माजी संचालकअश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांसाठी ते एक आदर्श होते. त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही अत्यंत दुःखद घटना आहे अशी प्रतिक्रिया मोहित चावला यांनी दिली आहे. अश्वनी कुमार हे ऑगस्ट २००६ ते २००८ या कालावधीत हिमाचल प्रदेशचे डिजीपी होते. त्यानंतर त्यांना सीबीआयचे संचालक पद देण्यात आले. ऑगस्ट २००८ ते २०१० पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर मणिपूरचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जुलै २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत ते या पदावर होते.
अश्वनी कुमार हे अत्यंत शालीन आणि गंभीर स्वभावाचे होते. ते कमी बोलत असत मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असे. सीबीआयचे संचालक म्हणून काम करताना त्यांच्या कार्यकाळात अनेक हायप्रोफाइल केसेस त्यावेळी सीबीआयकडे आल्या होत्या. आरुषी हत्याकांडाचा तपास जेव्हा त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता तेव्हा नोकराविरोधात त्यांना चार्जशीट फाईल करु देण्यापासून रोखण्यात आले होते. आरुषी प्रकरण त्यांच्याकडून काढून घेत ते एका नव्या टीमला सुपूर्द करण्यात आलं. सीबीआयच्या नव्या टीमने पूर्णतः वेगळा अहवाल दिला. अश्वनी कुमार यांनी आरुषी प्रकरणात दिलेला अहवाल आणि नंतरच्या टीमने दिलेला अहवाल यामध्ये जमीन आस्मानाचा फरक होता. त्यामुळे सीबीआयच्या संचालकपदी त्यांना नेमलं जाणं हे अनेकांसाठी धक्का देणारंच ठरलं होतं.
अश्वनी कुमार यांनी हिमाचल प्रदेशचे डीजीपी म्हणून काम करताना ठिकाणी अनेक गोष्टींमध्ये सुधारणा केली. हिमाचल पोलीस ठाण्याचे डिजिटलीकरण तसेच पोलीस ठाण्यात कॉम्प्युटरचा उपयोग या सगळ्याची सुरुवात त्यांनी केली होती. अश्वनी कुमार हे डीजीपी असताना तक्रारींचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरु झालं. ज्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना पोलीस ठाण्यात चकरा मारण्याचा त्रास वाचला होता. एक धीरोदात्त आणि समस्यांची उकल करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी नैराश्याला कंटाळून आत्महत्या करणं हा आम्हा सगळ्यांसाठी धक्का आहे असं शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी म्हटलं आहे.