UttarpradeshCrimeUpdate : धक्कादायक : हाथरस मध्ये आणखी एका सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार , उपचारादरम्यान मृत्यू

उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच हाथरसमधूनच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाथरसमधील ६ वर्षांच्या मुलीवर मावसभावानेच बलात्कार केल्याचं प्रकरण समोरं आलं आहे. पीडितेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच बिकट झाल्याचे पाहून त्याला दिल्ली येथे पाठविण्यात आले, मात्र आज तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान पीडितेचा मृतदेह दिल्लीहून राहत्या घरी आणत असताना पीडितेच्या कुटुंबियांनी रस्ता रोखला. पीडितेच्या कुटूंबाने अलीगड इग्लास पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतरच मुलीवर अंत्यसंस्कार केले जातील.
याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृत पीडितेच्या आईचे ७ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर मावशी पीडितेच्या आपल्या घरी घेऊन गेली. पीडितेच्या वडिलांनी असा आरोप केला आहे की, १० दिवसांपूर्वी मावशीच्या मुलाने पीडितेवर बलात्कार केला. इतकेच नाही तर तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवले. घराबाहेर खेळणाऱ्या मुलांनी पीडितेचा ओरडण्याचा आवाज ऐकला. यानंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने निष्पाप मुलीला रुग्णालयात दाखल केले. प्रकृती बिघडल्याचे पाहून त्याला दिल्लीला पाठविण्यात आले, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर मावशी आणि तिच्या मुलाविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३४२, ३७६, १२० बी आणि लैंगिक गुन्हेगारापासून मुलांचे संरक्षण कायदा २०१२च्या कलम ५ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत इगलेस पोलीस ठाण्याचे एसएचओ यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.