EducationNewsUpdate : जेईई अॅडव्हान्स -२०२० परीक्षेचा निकाल जाहीर , पुण्याचा चिराग फलोर हा विद्यार्थी देशात अव्वल

जेईई अॅडव्हान्स -२०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर हा विद्यार्थी देशात सर्वप्रथम आला आहे. आयआयटी मुंबई विभागातील हा विद्यार्थी आहे. एकूण १ लाख ५० हजार ८३८ विद्यार्थांनी ही परीक्षा दिली होती. पेपर -१ आणि २ साठी एकूण ४३ हजार २०४ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स -२०२०साठी पात्र ठरले होते. चिराग फलोर हा या परीक्षेत कॉमन रँक लिस्टमध्ये टॉपर ठरला असून, त्याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवले आहेत. तर, आयआयटी रुरकी झोनच्या कनिष्क मित्तल कॉमन रँक लिस्टमधील १७ व्या क्रमांकासह विद्यार्थीनींमध्ये टॉपर आहे. त्यांनी ३९६ पैकी ३१५ गुण मिळवले आहेत.
मागील वर्षी देखील जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा टॉपर महाराष्ट्रातीलच होता. कार्तिकेय गुप्ता या विद्यार्थ्याने ३७२ पैकी ३४६ गुण मिळवले होते. यंदा निकाल घोषित करते वेळी बारावीच्या गुणांचा विचार केला गेला नाही. नव्या नियमानुसार निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदर जेईई अॅडव्हान्समध्ये भाग घेण्यासाठी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना ७५ टक्के गुण मिळवणे गरजेचे होते. या वर्षी करोना महामारीमुळे CBSE आणि CISCE सह अनेक बोर्डांनी विशेष योजनांच्या आधारावर निकाल जाहीर केले आहेत.
जेईई(अॅडव्हान्स) परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले एकूण गुण म्हणजे, त्यांच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषायांमधील गुणांची बेरीज. एकूण गुणांच्या आधारे रँक लिस्ट तयार केल्या जातात. जे विद्यार्थी पेपर -१ आणि २ होते त्यांनाच रँकिंगसाठी ग्राह्य धरले जाते. प्रत्येक विषयात व एकूण गुणांमध्ये किमान गुण मिळवणारे विद्यार्थ्यांचा रँक लिस्ट मध्ये समावेश असतो. किमान विहीत गुण श्रेणीनुसार बदलू शकतात. जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल आज अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in च्या माध्यमातून आपला निकाल पाहू शकतात. या परीक्षेचा निकाल जाहीर होताच केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.