HatharasGangRape : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी शिवसेनेची निदर्शने

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना नेते शिशिर शिंदे हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आता शिवसेनेने निदर्शनं सुरु केली आहेत. हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. तिला मारहाण करण्यात आली. मोदी सरकार हाय हाय अशाही घोषणा देण्यात येत आहेत. या निदर्शनांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या आंदोलनात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचाही सहभाग होता.
हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपरादरम्यान या मुलीचा दिल्लीतल्या रुग्णालयात मृत्यू झाला. या सगळ्या घटनेचे पडसाद बुधवार, गुरुवार असे दोन दिवस देशभरातल्या विविध ठिकाणी उमटले. हाथरस या ठिकाणी गुरुवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना अडवण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला. रात्री उशिरा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात महामारी अॅक्टनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला.
दरम्यान, जाळून मुलगी दिला संदेश बदनाम झालं उत्तरप्रदेश, दलित बेटी की जान गयी, सीएम, मोदीका ध्यान नहीं अशा घोषणाही यावेळी शिवसेनेने दिल्या आहेत. युपीमें दुःख मस्तीमें, पुलिस दरिंदे मस्तीमें अशाही घोषणाही दिल्या गेल्या. उत्तर प्रदेशातून कमाई करण्यासाठी अनेक लोक मुंबईत येतात. मुंबई त्यांना सामावूनही घेते मात्र मुंबईला कुणी काही बोललं तर हे लोक आवाज उठवत नाहीत. आता उत्तर प्रदेशात एवढी अमानुष घटना घडली आहे तर उत्तर प्रदेशातले लोक गप्प का असाही प्रश्न काही आंदोलकांनी विचारला. उत्तर प्रदेशातील हाथरस या घटनेचा निषेध आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केला. देशात अराजक माजलं आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर हाथरसमध्ये घडलेली घटना आणि त्यानंतर करण्यात आलेली काँग्रेस नेत्यांची अडवणूक हा लोकशाहीवर झालेला सामूहिक बलात्कार आहे असं म्हणत संजय राऊत यांनी निषेध नोंदवला आहे.