IndiaNewsUpdate : “चांदोबा”च्या विक्रम आणि वेताळचे जन्मदाते चित्रकार के.सी. शिवशंकर यांचे निधन

कार्टून सौजन्य : सतीश आचार्य आणि सिफी डॉट कॉम
देशभरातील घराघरात संस्कार करणारे प्रसिद्ध मासिक चांदोबा मधील विक्रम-वेताळ यांसारख्या कथांचे प्रसिद्ध चित्रकार के.सी. शिवशंकर (९७) यांचे चेन्नई येथे त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. शिवशंकर हे “चंदामामा”च्या मूळच्या टीममधील शेवटचे कलाकार होते. आर्टिस्ट शंकर या टोपन नावाने ते प्रसिध्द होते. त्यांच्या मागे पत्नी गिरीजा, चार मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांनी “चांदोबा” साठी १९६० साली रेखाटलेलं विक्रम-वेताळ मालिकेतील आपल्या एका खांद्यावर वेताळचा मृतदेह आणि दुसऱ्या हातात तलवार घेतलेल्या विक्रमचे चित्र प्रचंड प्रसिध्द झाले. ते चित्र आणि त्याच्या खाली त्यांची सही हे “चांदोबा ” च्या वाचकांच्या कायम समरणात राहील . त्यांच्या चित्रशैलीवर भारतीय, मध्य पूर्व आणि युरोपियन कलाशैलीचा प्रभाव होता.
के. सी. शिवशंकर यांचा जन्म १९२४ साली तामिळनाडूतील इरोड या खेडेगावात झाला. त्यांचे वडील स्थानिक शाळेत शिक्षक होते तर आई गृहिणी होती. १९३४ साली त्यांनी चेन्नईला स्थलांतर केले. १९४१ साली त्यांनी चेन्नईतील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फाइन आर्टस् या महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवी प्राप्त केल्यानंतर ‘कलाईमगल’ या नियतकालिकेत त्यांनी नोकरी सुरू केली. १९५२ साली त्यांना ‘चंदामामा’ या मासिकात नोकरी मिळाली आणि एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे जन्माला आली. विक्रम-वेताळचे चित्र त्यापैकीच एक. चंदामामाचे संस्थापक बी. नागी रेड्डी यांच्या मते शिवशंकर हे चंदामामा टीमचे महत्वपूर्ण घटक होते. त्यांच्या उपनिषिदे , पुराण आणि इतिहासातील अनेक अप्रतिम चित्रांमुळे आत्ताच्या पिढीतील अनेकांचे बालपण स्मरणात राहिले आहे.
‘चंदामामा’ या लहान मुलांसाठीचे मूळचे तेलगु भाषिक नियतकालिकाची स्थापना १९४७ साली चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी आणि चक्रपाणी यांनी स्थापना केली. तेरा भारतीय भाषांत प्रकाशित होणाऱ्या या नियतकालिकेने लहान मुलांच्या विश्वात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. तामिळ भाषेत ‘अंबुलीमामा’ या नावाने प्रकाशित होणाऱ्या या नियतकालिकेची हिंदी भाषेतील आवृत्ती १९४९ साली सुरू झाली.१९५२साली मराठी भाषेत ‘चांदोबा’ या नावाने ही नियतकालिका सुरू झाली आणि अल्पावधीतच लहान मुलांमध्ये प्रसिध्द झाली होती. २००७ साली जिओडेसिक या मुंबईतील सॉफ्टवेअर कंपनीने या नियतकालिकेतील सगळी माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी मालकी मिळवली. २०१३ साली आर्थिक अडचणींमुळे या नियतकालिकेचे प्रकाशन बंद झाले. आजच्या टिव्ही, इंटरनेट, मोबाईलच्या काळात चांदोबाची लोकप्रियता कमी झाली असली तरी आजही चांदोबाचा वारसा सांभाळणारे लोक काही कमी नाहीत. २०१७ साली काही स्वंयसेवकांच्या पुढाकाराने चांदोबाच्या कथांचे डिजिटलायझेशन करुन याचे जतन करण्यात येत आहे.”चांदोबा”च्या विक्रम आणि वेताळच्या जन्मदात्या चित्रकाराला ” महानायक ऑनलाईनची भावपूर्ण आदरांजली.