IndiaNewsUpdate : HathrasGangRapecase : अखेर मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचा पीडितेच्या पित्याशी केला ” हा ” संवाद…. आणि पीडितेची आई भडकली …

Lucknow: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath speaks to the family of #Hathras gang-rape victim, via video conferencing. pic.twitter.com/htIprJUk0W
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 30, 2020
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील गँगरेप प्रकरणी पीडित तरुणीवर पोलीस-प्रशासनाने परस्पर अंत्यसंस्करा केल्याने उत्तर प्रदेशसह देशातील अनेक भागांमध्ये आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात येत आहेत. दरम्यान देशभरात या प्रकरणी उफाळून आलेला असंतोष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोन नंतर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित तरुणीच्या वडिलांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क केला. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, शासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल तसेच २५ लाखांच्या आर्थिक मदतीचं आश्वासनही देण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क केला. मृत तरुणीच्या वडिलांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री दोषींवर कठोर कारवाईसह प्रशासनाकडू सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं, असं अवस्थी यांनी सांगितलं. पीडितेच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. यासह कनिष्ट सहायक पदावर कुटुंबातील कुठल्याही एका सदस्याला नोकरी देण्यात येणार आहे. गृह योजनेअंतर्गत हाथरस शहरात कुटुंबाला घरही दिलं जाईल. यासोबत या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने चौकशीसाठी ३ सदस्यांची एसआयटीही नेमली आहे.
दरम्यान पीडित तरुणीवर रातोरात पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केले. यावेळी तरुणीचे कुटुंबीयही उपस्थित नव्हते. यामुळे जनतेमध्ये पोलीस आणि प्रशासनाविरोधत प्रचंड रोष आहे. आता हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आपल्या कारवाईवर स्पष्टकरण दिलं आहे. पीडित तरुणीचा मृतदेह खराब होत चालल्याने आम्ही कुटुंबीयांची परवानगी घेऊन रात्रीच अंत्यसंस्कार केले. पीडितेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. त्यात जे तथ्य आढळून येतील, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असं राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं.
पोलिसांवर भडकली पीडितेची आई
पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव आणून त्यांना विश्वासात न घेता काल रात्री पीडितेवर परस्पर अंत्यसंस्कार केले. यावरून कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता बुधवारी खासदार राजवीर सिंह दिलेरही पीडित कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले. यावेळी पीडितेच्या आईचा राग अनावर झाला आणि त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप केले. अंत्यसंस्कारापूर्वी आम्हाला आमच्या मुलीचा चेहराही दाखवला गेला नाही. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक आले होते. मुलीचं हाड मोडलेलं नाही आणि तिला कुठलीही दुखापत झाली नाही. ते खोट बोलत आहेत आणि प्रत्येक मुद्द्यावर खोटी विधानं करत आहेत, असा आरोप बुधवारी पीडितेच्या आईने केला. त्यांच्या मुलीसोबत असं काही घडलं असतं तर त्यांनी सहन केलं असतं का? आता ही दलितची मुलगी आहे. म्हणून प्रकरण दाबलं जात आहे, असा आरोप पीडितेच्या आईने केला. दरम्यान आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत. आम्हालाही इथं येण्याची परवानगी नव्हती, कारण प्रकरण गंभीर आहे. आम्ही कुटुंबासोबत आहोत आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं खासदार म्हणाले.
दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे बुधवारी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला असून देशभर संतापाची लाट उसळली आहे. हाथरस परिसरातील अनेक गावकरी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात आज दिवसभर निदर्शनं केली. हाथरसच्या निर्भयासाठी देशाच्या विविध भागात तसंच सोशल मीडियावर मोहीम उघडण्यात आली आहे. १९ वर्षीय दलित तरुणीवर १४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पण तिचा काल दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर हाथरस पोलिसांनी घाईघाईत रातोरात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मुलीचा चेहराही पाहू दिला नाही आणि आमच्या अनुपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेवरून देशभरात संताप आहे.