MaharashtraCoronaUpdate : मुक्तपणे संचार करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना आवर घालण्यासाठी नागपूर खंडपीठाने दिले हे आदेश

शहरात मुक्तपणे फिरणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुगांना आवर घालण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात यावा आणि कोरोना तपासणी करणाऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांना दिला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर शहरातील वाढत्या मृत्यूदराची दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्या. रवी देशपांडे यांनी शहरात कोरोना पॉझिटीव्ह असणारे रूग्ण फिरत असल्याने करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे निरीक्षण नोंदवले.
न्यायालयाने म्हटले आहे कि , कोरोनाबाधित रुग्णांनी घरात अथवा रूग्णालयात राहून उपचार घेणे आवश्यक आहे. परंतु, ते घराबाहेर खरेदी करण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी जात असतील तर त्यांची ओळख पटविणे आवश्यक आहे. ते अकारण घराबाहेर जात असतील तर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, असे मत नोंदविले. तेव्हा विभागीय व महापालिका आयुक्तांनी अशाप्रकारे लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना स्टॅम्प लावता येणार नाही,असे नमूद केले. कोरोनाची लागण होणे ही सामाजिक कलंक मानल्या जातो आहे, त्यामुळे अशापप्रकारे स्टॅम्प लावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम रूग्णांवर होईल, असे नमूद केले. तेव्हा त्यावर न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांचा अभिप्राय मागितला. अॅड. धर्माधिकारी म्हणाले, करोनाची बाधा होणे आता सामाजिक कलंक राहीलेला नाही. शहरातील प्रत्येक कुटूंबातील एका सदस्याला कोरोना झाला आहे. त्यामुळे लक्षणे नसणाऱ्यांना जर होम क्वारंटाईन ठेवायचे असेल तर त्यांच्या हातवर स्टॅम्प लावण्यात यावा, असे त्यांनी सुचवले. तसेच करोना चाचणी केल्याचीही ओळख पटावी यासाठी तपासणीसाठी जाणाऱ्या व्यक्तीच्या बोटावर शाई लावण्यात यावी.
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून २५ तारखेला कृती अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालय मित्र म्हणून अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी, मनपातर्फे सुधीर पुराणिक, सरकारतर्फे दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली. जीवनरक्षक औषधी आणि ऑक्सीजनचा काही रूग्णालयांकडून अतिरिक्त साठा करून ठेवण्यात येत आहे, त्यामुळे ऑक्सीजन व औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन आयुक्त अरूण उन्हाळे यांनी हायकोर्टात सादर केली. तेव्हा अशाप्रकारे साठेबाजी करणाऱ्या रूग्णालयांची सहआयुक्तांनी तातडीने तपासणी करावी व गरजेपेक्षा अधिक साठा आढळून आल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, असा आदेश दिला.