MaharashtraNewsUpdate : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कृषी विधेयकावरील “चुप्पी ” मुळे काँग्रेसची नाराजी

संसदीय अधिवेशनात केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ना विरोध केला ना ते सभागृहात उपस्थित राहिले त्यांच्या या भूमिकेवरून तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेनेनेही या विधयेकांना विरोध न केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त व्यक्त केली असून याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना या संदर्भात आपली तीव्र प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कि , या विधेयकाला काँग्रेसचा विरोध कायम आहे. हे विधेयक शेतकरी वर्गाची मुंडी तोडणारे आहे तर व्यापार्यांना फायदा करणार्या विधेयकाला काँग्रेस विरोध करत आहे पक्षांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी या विधेयकाला विरोध करणं गरजेचं आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
‘महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी या विधेयकाला विरोध का केला नाही ? याचे तेच उत्तर देतील, काँग्रेस पक्ष देखील या संदर्भात विचारणा करेल. आम्ही आमची या विधेयकाच्या विरोधातील भूमिका स्पष्टपणे मांडली आहे . सभागृहामध्ये बहुमताचा आकडा असल्याने हुकूमशाही पद्धतीने विधेयक केंद्र सरकार मंजूर करत असल्याचा टीका देखील थोरात यांनी यावेळी केली.
दरम्यान, राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना गोंधळ घातला म्हणून ८ खासदारांना निलंबित करण्यात आले. निलंबित ८ ही खासदारांनी गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनात ठिय्या मांडला आहे. अजूनही या खासदारांचे आंदोलन हे सुरूच आहे. तर उपसभापती हरिवंश सिंह यांनी एक दिवस उपवास करण्याची घोषणा केली आहे. सभापतींच्या या कारवाईच्या निषेधार्थ सर्व खासदारांनी संसद भवनाच्या आवारात गांधी पुतळ्याजवळ कालपासून ठिय्या मांडला. रात्रभर सर्व खासदारांनी ठिय्या काही सोडला नाही. अखेर सकाळी खुद्द उपसभापतीच या आठही खासदारांना चहा घेऊन आले होते. या आंदोलनात राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्यासह डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम (CPI-M) यांचा सहभाग आहे.