धक्कदायक आणि भयंकर !! गरोदर पत्नीच्या पोटातील बाळाचे लिंग निदान करण्यासाठी ” त्याने ” आपल्या गरोदर पत्नीचे थेट पोट कापले …..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना ” बेटी बचाव , बेटी पढाव ” चा कितीही नारा दिला किंवा देशातील भ्रूणहत्या थांबाव्यात म्हणून कितीही कडक कायदे केले तरी समाजात मुलींना आणि महिलांना मिळणाऱ्या दुय्यम स्थानामुळे महिलांकडे पाहण्याचा किंवा मुलींकडे पाहण्याच्या मानसिकतेत बदल होताना दिसत नाही. पुरुष प्रधान संस्कृतीला महत्व देणारे लोक अडाणी असोत कि शिक्षित यांच्या स्त्री -पुरुष यांच्यात भेद करणाऱ्या प्रवृत्तीत क्वचितच बदल झालेला दिसतो . या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात घडलेली हि घटना अत्यंत भयानक आहे . स्त्री-पुरुष समानतेसाठी विविध योजना राबविणाऱ्या आपल्या देशात आजही असे प्रकार घडणे हे अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. या घटनेत उत्तर प्रदेशातील पाच मुलींचा पिता असलेल्या नराधमाने अत्यंत क्रूर कृत्य केल्याचे वृत्त आहे. पाच मुली खूप झाल्या आता मुलगाच हवा या अतिरेकी विचारातून या ५ मुलीच्या बापाने आपल्या गर्भवती पत्नीचे पोट चिरून पोटातील बाळाचे लिंगनिदान करण्याचा जीवघेणा प्रयत्न केला आहे.
उत्तर प्रदेशाच्या बदायूं जिल्ह्यातील नेकपूर येथे घडलेल्या या घटनेत गरोदर पत्नीच्या पोटातील बाळाचं लिंग पाहण्यासाठी त्याने पत्नीचे पोट फाडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसही हादरून गेले . पन्नालाल (४५ ) असे या विकृत पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. तो मजूर आहे . सदर महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण सिंह चौहान यांनी दिली. या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबीयांनी या महिलेला तातडीने बरेली येते उपचारासाठी दाखल केले आहे. शनिवारी हि घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले कि , पन्नालाल याला ५ मुली असून आता त्याला पत्नीकडून मुलाची अपेक्षा होती त्यामुळे त्याने आता मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी त्याने धारदार शस्त्राने पत्नीचं पोट कापण्याचा भयंकर अपराध केला. या महिलेचे नाव अनितादेवी (४०) असे असून ती ७ महिन्यांची गर्भवती आहे.
दरम्यान तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर राजेशकुमार वर्मा यांनी सांगितले कि , सदर महिलेच्या पोटावर धारदार शास्त्राने वार करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. जखमी महिलेचा भाऊ रवीकुमार याने पोलिसांना सांगितले कि , आरोपी नेहमीच मुलगा होत नाही म्हणून बहिणीला मारहाण करीत होता. त्याला अनेकदा समजावून सांगितले तरी त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती अखेर त्याने हे भयंकर कृत्य केले. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे इन्चार्ज सुधाकर पांडे यांनी सांगितले कि , पोलीस या प्रकरणात अधिक तपस करीत आहेत.