IndiaNewsUpdate : नाही नाही म्हणताना , शेवटी लॉकडाऊन दरम्यान किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला ? याचे उत्तर सरकारने दिले ….

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिला आणि दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारला लॉकडाउन दरम्यान किती स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला? असे प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर याची शासनाकडे कुठली माहिती नसल्याचे सांगितल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते मात्र सरकारने आता लॉकडाऊन दरम्यान श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये किती स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ९ सप्टेंबरपर्यंत एकूण ९७ जणांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला, असे हे उत्तर आहे.
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी राज्यसभेत हा प्रश्न विचारला होता. ९ सप्टेंबरपर्यंत एकूण ९७ स्थलांतरीत मजुरांचा प्रवासादरम्यान स्पेशल ट्रेनमध्ये मृत्यू झाला आहे. या ९७ मृतांपैकी ८७ मृतदेह राज्य पोलिसांकडून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. आतापर्यंत संबंधित राज्य पोलिसांकडून ५१ पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती आले आहेत. यात ह्रदय विकाराचा झटका, हृदयरोग, मेंदूत रक्तस्राव, फुफ्फुस आणि यकृताच्या आजाराची कारणं देण्यात आली आहेत, अशी माहिती रेल्वे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलीय.
यापूर्वी मे महिन्यात ८० स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये ९ मे ते २९ मे दरम्यान ८० स्थालांतरीत मजुरांचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांच्या माहितीवरून देण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या संकटानंतर देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला. या काळात स्थलांतरीत मजुरांचे प्रचंड हाल झाले. लाखो स्थलांतरित मजूर रस्त्यावर आले होते. यावेळी अनेकांच्या मृत्यूच्या बातम्याही समोर आल्या. या विषयावर सोमवारी संसदेत सरकारला प्रश्न विचारला गेला. पण यासंदर्भात कुठलीही माहिती नसल्याचं सरकारनं सोमवारी सांगितलं होतं. लॉकडाउन दरम्यान जवळपास ८० कोटी नागरिकांना अतिरिक्त रेशन दिलं गेलं. ही प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील, असं सरकारने सांगितलं होतं.