MaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा

राज्य सरकारमधील मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कोरोना झाला असला, तरी आपली तब्येत उत्तम असल्याचंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. हसन मुश्रीफ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.’, असं ट्विट हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. हसन मुश्रीफ यांच्याआधी उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही आज सकाळीच आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं. राऊत यांनी संपर्कात आलेल्यांना क्वारंटाई व्हावे तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांनीही याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे कि , ‘काल मला अशक्तपणा वाटत असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतला. यानंतर तपासणी करताना माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती चांगली आहे. मी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. तसंच ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या असतील, त्यांनी काळजी घ्यावी आणि नियम पाळावेत. सुरक्षित राहा.’ याआधी महाविकासआघाडीतल्या सुनिल केदार, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती.