जोधपूर न्यायालयाचे समन्स जारी , सलमान खान हाजीर हो….

काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या अडचणीत वाढल्या आहेत. जोधपूर कोर्टानं सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमधील जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयानं सलमानला २८ सप्टेंबर रोजी कोर्टात राहण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सलमानचे वकील स्तीमल सारस्वत कोर्टात उपस्थित होते. यापूर्वी सलमानने सुनावणीला कोर्टात हजर राहण्यास सूट मागितली होती. कोर्टानं त्याची विनंती मान्य केली होती आता मात्र त्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान,काळवीट शिकार प्रकरणात खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टानं निर्दोष ठरवलं आहे. राजस्थान सरकारनं २००६ मध्ये सलमानवर खोटं प्रतिज्ञापत्र जमा केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती.
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानने राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानं त्याला सहा दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते.
या प्रकरणी त्याला दोनवेळा १९९८ आणि २००७ मध्ये जोधपूर कारागृहात जावं लागलं आहे. या प्रकरणात सलमानसह चित्रपटातील अन्य कलाकार सैफअली खान, तब्बू,सोनाली बेंद्रे व नीलम यांच्यावर आरोप करण्यात आले होते. पण, सलमानकडं शस्त्र सापडल्यानं त्याला दोषी ठरविण्यात आलं होतं.