IndiaNewsUpdate : देशात कोरोनावर लस आल्यास पहिला डोस घेण्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा

येत्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये कोरोनावर लस तयार होऊ शकते अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली असून देशात तयार झालेल्या औषधाचा पहिला डोस घेण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधताना त्यांनी हि इच्छा व्यक्त केली. त्यामुळे लोकांमध्ये औषधाविषयी असलेली भीती दूर होईल असंही ते म्हणाले. भारतात Oxford-AstraZenecaच्या लशीच्या चाचण्या सीरमच्या मदतीने सुरू आहेत. सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादनही करणार आहे. तर Bharat Biotech च्या Covaxin आणि Zydus Cadilaच्या ZyCoV-D या लशींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. कोरोनावरची लस 2021च्या पहिल्या तीन महिन्यात येऊ शकते असा अंदाजही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या लशींंचं काम प्रगतीपथावर असून त्यांना पाहिजे त्या सर्व परवानग्या तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असंही ते म्हणाले.
दरम्यान संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत ५ खासदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी होणार आहे. कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अजुन मिळालेले नाही अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे. संसदेत दररोज फक्त ४ तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही ऑनलाईन पद्धतीनेच दिली जाणार आहेत. संसंद भवनाचा परिसर सॅनिटाइज करण्यात आला असून खासदारांनी काय काळजी घ्यावी याची नियमावली देण्यात आली आहे. दोनही सभागृहांचं आतूनही सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे.