IndiaNewsUpdate : संसदेच्या अधिवेशनाला आजपासून प्रारंभ , सभागृहात जाण्यापूर्वी होणार सर्वांचीच कोरोना टेस्ट , पाच खासदार पॉझिटिव्ह

देशाच्या संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात चीनपासून ते बेरोजगारीपर्यंत अनेक मुद्यांवरून चर्चा होण्याची शक्यत असून, दुसरीकडे कोरोनाचा संसर्गाची वाढताना दिसत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना करोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ऐन अधिवेशनाच्या एक दिवस अगोदरच पाच खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
यंदाच्या पावसाळी अधिवेशनात असंख्य मुद्दे असले तरी दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत चाललेला आकडा, घसरलेला जीडीपी, लॉकडाउनचा सर्वसामान्यांना बसलेला फटका, वाढत चाललेली बेरोजगारी, चीनसोबत चिघळलेला सीमावाद, चीनकडून झालेली घुसखोरी यासह अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत. त्यामुळे विरोधक सरकारला कोडींत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रश्नोत्तराच्या तासावरूनही सभागृहांमध्ये विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळू शकतं. त्यामुळे मोदी सरकारसाठी हे अधिवेशन कसोटी प्रमाणे ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक खबरदारीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर सभागृह सदस्यांनाही ७२ तास अगोदर करोना चाचणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत पाच लोकसभा सदस्यांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अधिवेशनावरील करोनाची भीती आणखी गडद झाली आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊनच संसदेच पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर अधिवेशन होत असलं तरी करोनाचं संकट मात्र कायम आहे.