MumbaiNewsUpdate : मुख्यमंत्री , गृहमंत्री , शरद पवार आणि संजय राऊत यांना धमकावणारा एटीएसच्या ताब्यात

The accused who made threat calls to Sanjay Raut from international mobile number posing as member of Dawood Ibrahim gang arrested from Kolkata: Maharashtra Anti Terrorism Squad https://t.co/M9708xKa2I pic.twitter.com/rmDj8yL7oK
— ANI (@ANI) September 12, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना खासदार संजय राऊत या नेत्यांना धमक्या देणाऱ्या आरोपीला मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. या सर्वांना धमकावणारी व्यक्ती एकच व्यक्ती असून त्याला कोलकातामधून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील सदस्य असल्याचे सांगत त्याने ह्या धमक्या दिल्या होत्या. अटक केलेल्या आरोपीचं नाव पलाश बोस असून तो ४९ वर्षांचा आहे. पलाश बोसने या धमक्या का दिल्या याचं कारण मुंबई एटीएस शोधत आहे. मात्र, संजय राऊत यांना धमकी देण्याच्या वेळी सुशांत प्रकरणापासून लांब राहण्याचा इशारा त्याच्याकडून देण्यात आला होता. तसेच मातोश्रीवर फोन करुन मातोश्रीला बॉम्बने उडवण्याची धमकी या व्यक्तीकडून देण्यात आली होती. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नागपूर आणि मुंबई कार्यालयात फोन करुन तर शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून पलाश बोसने धमक्या दिल्या होत्या.
एटीएसचे उपायुक्त विक्रम देशमाने या कारवाईबाबत माहिती देताना म्हणाले कि , “संजय राऊत यांना धमकी देणारा फोन कॉल आम्ही ट्रेस केला. यामध्ये हा फोन कोलकाता येथून आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, धमकीच्या कॉलप्रकरणी प्राथमिक तपासातून हे दिसून येत होतं की, यापूर्वी काही राजकारण्यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल्समध्ये याच व्यक्तीचा समावेश आहे. या व्यक्तीला कोलकात्यातून मुंबईत आणण्यात आले असून १४ सप्टेंबर रोजी त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.
आरोपी पलाष कोलकत्याच्या टॉलिगुंग येथे राहणार असून 1999 ते 2018 पर्यंत तो दुबईमध्ये राहत होता. पलाष बोस स्वतःला फिटनेस ट्रेनर सांगायचा. भारतात परतल्यानंतर त्याच्याकडे असलेले दुबईचे तीन सिमकार्ड त्याने चालूच ठेवले. सिल्वर डायल या ॲपद्वारे पलाषने व्हर्चुअल कॉलिंगद्वारे या बड्या नेत्यांना धमक्या दिल्या असल्याचे उघड झाले आहे. संजय राऊत यांना तर व्हिडियो कॉलद्वारे धमकी देण्यात आली होती. पलाष ने संजय राऊत यांच्या घराचा पत्ता, त्यांचा दिनक्रम आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती मिळवली होती. ही माहिती तो का गोळा करत होता याचा तपास एटीएसकडून लावला जात आहे. तर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला मातोश्रीची संपूर्ण माहिती पलाष गुगलद्वारे घेत होता. मातोश्री निवासस्थानात जाण्याचे कुठले कुठले मार्ग आहेत. मातोश्रीला जोडणारा रस्ता कुठे जातो. या सर्वांची माहिती पलाष गुगलद्वारे घेत होता असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान पलाष हे सगळं का करत होता आणि या मागचा त्याचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, त्यानं केलेलं हे कृत्य राजकारण्यांची चिंता वाढवणारं आहे. इतर अजून कुठल्या नेत्यांची माहिती पलाषने गोळा केली होती का? त्याच्यावर अजून कुठे गुन्हे दाखल आहेत का? इतके वर्ष दुबईमध्ये राहिल्यानंतर त्याचा दाऊदशी किंवा कुठल्या अंडरवर्ल्ड गँगशी संबंध आहे का? याचा तपास मुंबई एटीएसकडून केला जात आहे. पलाशला पकडण्यासाठी मुंबई एटीएसचे अधिकारी दया नायक यांनी त्यांच्या नेतृत्वात एक टीम निवडली आणि नियोजनबद्ध पद्धतीने तपास सुरू केला. या टीमने आठवड्याभराच्या आतच या प्रकरणाचा छडा लावला असून अधिक तपस चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.