महाराष्ट्र विधी मंडळ अधिवेशन विशेष : केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधासाठी मदत मिळेना : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत कोरोनाविषयी प्रश्नांना उत्तर देताना केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. खऱ्या मदतीची अपेक्षा आत्ताच आहे, पण केंद्र सरकार कुठली मदत द्यायला तयार नाही, असा दावा त्यांनी केला. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाव्हायरसच्या साथीसाठी आवश्यक सुविधा नाहीत. कोरोना काळात काही खासगी दवाखाने आणि डाॅक्टर कोव्हीड सेंटर सुरू करून लूट करत आहेत. यावर ठाकरे सरकारचं नियंत्रण नाही, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत पुरवणी प्रश्नांवर चर्चेच्या वेळी केली.
सभागृहात विरोधी पक्षाने राज्याची कोरोना व्हायरस साथ काळातली परिस्थिती भीषण आहे, असा आरोप केल्यानंतर त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे उभे बोलत होते. कोरोना संसर्गाच्या काळात राज्य सरकार सर्व प्रकारे साथ आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्यांनी सांगितलं. देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात होत असल्याचा दावा टोपे यांनी केला. आता अँटिजेन टेस्ट वाढाव्यात यासाठी त्या किट खरेदी करण्याचाही सरकारचा विचार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्य सरकारतर्फे काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. त्याच वेळी केंद्र सरकारकडून मात्र काहीच मदत मिळत नसल्याचंही त्यांनी सभागृहात सांगितलं.
राज्याला केंद्राच्या मदतीची आता खरी गरज असतानाच केंद्राने पाठ फिरवली आहे. मोदी सरकारने राज्य सरकारला कोविडसंदर्भात मिळत असलेली मदत बंद केली आहे. आत्ताच कोरोना साथीचा विस्फोट होत असताना मदतीची खरी अपेक्षा होती. पण नेमकी आत्ताच मोदी सरकारकडून राज्याला काही मदत मिळत नाही. पंतप्रधानांच्या ब्लू आईड बॉयने (म्हणजे लाडक्या नेत्याने) यात लक्ष घालावं, असंही टोपे यांनी देवेंद्र फडणवीस याचं थेट नाव न घेता सांगितलं. मराठवाडा आणि विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे.