CoronaMaharashtraUpdate : रुग्णांचा उच्चांक : गेल्या 24 तासात आढळले 20489 नवे रुग्ण , तर उपचारानंतर घरी गेले 10801 रुग्ण

गेल्या २४ तासांत करोनाचे तब्बल २० हजार ४८९ नवीन रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. त्याचवेळी दिवसभरात आणखी ३१२ जण करोनाने दगावले असून १० हजार ८०१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने नवा कळस गाठला आहे. २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद आज झाली. आज २० हजार ४८९ नवीन करोना बाधित आढळले असून हा आकडा पाहून सारेच हादरले आहेत. राज्यात आता अॅक्टिव्ह म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २० हजार ६६१ इतकी झाली आहे. आतापर्यंत करोनाच्या ४५ लाख ५६ हजार ७०७ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ८ लाख ८३ हजार ८६२ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
याशिवाय गेल्या २४ तासात ३१२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण २६ हजार २७६ रुग्ण करोनामुळे दगावले असून सध्याचा मृत्यूदर २.९७ टक्के इतका आहे. राज्यातील मृत्यूंचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब ठरली आहे. महाराष्ट्रात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा कमी झाले आहे. आज २० हजारावर नवे रुग्ण आढळले असताना तुलनेत साधारण निम्मे म्हणजे १० हजार ८०१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ६ लाख ३६ हजार ५७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७२.०१ टक्के इतकं आहे. राज्यात पुणे हा सध्या करोनासाठी हॉटस्पॉट बनला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या करोनाचे सर्वाधिक ५७ हजार ७७१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात करोना संसर्गाची लागण झालेल्या २३ हजार २७० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर मुंबईत सध्या करोनाचे २२ हजार ९७८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात गडचिरोली हा जिल्हा करोनाचा सर्वात कमी प्रादुर्भाव असणारा जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीत सध्या २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.