महाराष्ट्रातील २३ अधिकाऱ्यांना आय ए एस म्हणून मान्यता, विजयकुमार फड, वर्षां ठाकूर , टाकसाळे , डॉ . रामोड यांचा समावेश

वर्षा ठाकूर शिवानंद टाकसाळे
राज्याच्या महसूल सेवेतील २३ अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश मिळाला आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने याबाबतचे आदेश गुरुवारी काढले असून या सर्वाचा सनदी सेवेतील सन २०११च्या तुकडीत समावेश झाला आहे. दरम्यान राज्याच्या सेवेतून निवृत्त झालेल्या दोन अधिकाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार असून, त्यांना निवृत्तीनंतर दोन वर्षांसाठी सेवेत फेरप्रवेश मिळणार आहे. भारतीय प्रशासन सेवेत राज्य सेवेतील अधिकाऱ्यांचा राज्याला मिळालेल्या कोटय़ानुसार पदोन्नतीने समावेश होतो. महसूल विभागातील अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार, तर अन्य सर्व विभागांतील पात्र अधिकाऱ्यांचा निवड पद्धतीने सनदी सेवेत समावेश होतो.
वास्तविक पाहता , २०१८मध्येच महसूल सेवेतून या २३ अधिकाऱ्यांची सनदी सेवेत पदोन्नती होणार होती. मात्र राज्य सरकारने सेवाज्येष्ठतेनुसार पात्र अधिकाऱ्यांची यादी केंद्र सरकारला सादर करण्यास घातलेल्या घोळामुळे या अधिकाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळालेल्यांपैकी श्यामसुंदर पाटील आणि प्रमोद यादव दे दोन्ही अधिकारी नियत वयोमानानुसार मार्चमध्ये राज्य शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. मात्र सरकारच्या दिरगांईमुळे निवृत्ती आधी आपल्याला सनदी सेवेत पदोन्नती मिळाली नसल्याचा दावा करीत या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार ज्यावेळी हे अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र ठरले त्यावेळी सेवेत होते, त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरही त्यांना सनदी सेवेचा लाभ द्यावा , असा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून अशाप्रकारची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. राज्याच्या सेवेतील अधिकाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय हे ५८ वर्षे असून, केंद्रात हीच मुदत ६० वर्षे आहे. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांना दोन वर्षे सेवेचा लाभ मिळणार आहेत.
महाराष्ट्रातील या 23 अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये विजयकुमार फड, वर्षा ठाकूर, शिवानंद टाकसाळे, डॉ. अनिल रामोड, यांच्यासह यु . ए . जाधव, हरिश्चंद्र बगाटे, भाऊसाहेब बन्सी दांगडे , किशन नारायणराव जावळे, श्यामसुंदर लिलाधर पाटील, दिलीप स्वामी, संजय चव्हाण , सिद्धाराम साळीमठ, रघुनाथ गावडे, किशोर तावडे, प्रमोद यादव , कविता द्विवेदी , सुधाकर तेलंग, मंगेश मोहिते, राजेंद्र क्षीरसागर, प्रवीण पुरी, विनय प्रदीपकुमार डांगे, सी . डी . जोशी आदींचा समावेश आहे.