MaharashtraNewsUpdate : देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जीं यांना आदरांजली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचाच विचार करून त्यांनी आपली पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते. काँग्रेस पक्ष संकटात असताना अनेकदा वादळातील नौका किनाऱ्याला लावण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.
उत्तम पंतप्रधान होण्याची क्षमता त्यांच्यात होती, पण ते देशाचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. प्रणवबाबू आपल्यातून निघून गेले. त्यांचा प्रभाव देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ राहील. महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मी त्यांना आदरांजली वाहत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी साहेबांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करुन डॉ. प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील महान नेतृत्व होतं. डॉ. मनमोहनसिंह यांच्यासारख्या अर्थतज्ञ पंतप्रधानांच्या काळात देशाचं अर्थमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळून त्यांनी क्षमता सिद्ध केली होती. देशासमोरच्या महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांचं मत महत्त्वाचं असायचं. देशासमोरच्या आव्हानात्मक परिस्थितीत राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय साधून प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आदरणीय प्रणवदांकडे होतं. त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राचीही हानी आहे. देशाच्या या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
डॉ. नितीन राऊत
लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फार मोठे योगदान दिले असून यावेळी त्यांचे जाणे मनाला चटके लावून जाते, अशी शोकसंवेदना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली. आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रणवदांनी एक उत्कृष्ट व व्यासंगी राजकारणी म्हणून आपली भूमिका बजावली आहे. खासदार, मंत्री व नंतर देशाचे राष्ट्रपती अशी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावल्या. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी देशसेवा केली असून त्यांची आठवण ही सदैव प्रेरणादायी ठरणार आहे. ते ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान, सुसंस्कृत व राजकारणी होते. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. मनमोहनसिंह यांच्यासारख्या अर्थतज्ञ पंतप्रधानांच्या काळात देशाचं अर्थमंत्रीपद सांभाळत त्यांनी नव्या आर्थिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. ते आज काळाच्या पडद्याआड गेल्याने देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशा महान नेत्याच्या निधनामुळे मला अतीव दुःख झाले असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे, अशा शब्दात डॉ. राऊत यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
विजय वडेट्टीवार
ज्येष्ठ, अनुभवी, मार्गदर्शक माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दु:ख व्यक्त करुन डॉ. प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, इंदिराजींपासून ते आजपर्यंत प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, सभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. डॉ. प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील मोठे नेतृत्व होते. देश घडविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राची आणि काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे देशामध्ये व काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. देशाच्या या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
अशोक चव्हाण
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित होते. देशाची अर्थ नीती व परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्यांच्या रूपात भारताचे एक अनुभवी मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्याशी चव्हाण कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध होते. ते आणि डॉ. शंकरराव चव्हाण केंद्रीय मंत्रिमंडळात सहकारी होते. संघटनात्मक आणि शासकीय कामांच्या निमित्ताने मलाही अनेकदा प्रणव मुखर्जी यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळाली. ते एक अतिशय प्रतिभाशाली, अभ्यासू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असून, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.