MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : विठ्ठल -रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत बंदच , आंदोलनाचा परिणाम नाही….

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि वारकऱ्यांनी काल विठ्ठलाचे मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन केले असले तरी , राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज हि माहिती देण्यात आली आहे. गेल्या १७ मार्चपासून हे मंदिर बंद आहे. त्यामुळे साडेपाच महिन्यांपासून भाविकांना दर्शन घेता आले नाही. सोमवारी वंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या आंदोलनानंतर शासनाने येत्या १० दिवसांत मंदिर उघडण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे. मात्र मंदिर समितीला शासनाकडून काहीच आदेश नसल्याने आता ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. समितीने म्हटले आहे कि , देवाचे सर्व नित्योपचार परंपरेप्रमाणे सुरू असून विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन ऑनलाइन घेण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध आहे.
दरम्यान, विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील मंदिरे पुन्हा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपुर येथे आंदोलन करण्यात आले होते. वंचितच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिर , मशीद , बौद्ध मंदिर , गुरुद्वारा हे लवकरात लवकर भाविकांसाठी सुरु करण्यात येतील. यासाठी नियमावली बनवण्यात येईल, असं अश्वासन दिलं होतं. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. त्याचबरोबर, प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे यांच्यासह सह १५ जणांनी मंदिरात विठुरायाच्या मुखदर्शनही घेतले होते. मात्र आंदोलन संपल्यानंतर मनाई असतानाही जमावबंदीचा आदेश झुगारून पंढरपुरात आंदोलन केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारे १२ नेते आणि आंदोलनात सहभागी झालेल्या दिड हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व मंदिर , मशीद , बौद्ध मंदिर , गुरुद्वारा हे लवकरात लवकर भाविकांसाठी सुरु करण्यात येतील, असं अश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन मागे घेतलं आहे. राज्यातील सर्व मंदिर , मशीद , बौद्ध मंदिर , गुरुद्वारा हे येत्या १० दिवसांत उघडण्याचे आश्वासन शासनाकडून मिळाले असून यासाठी नियमावली बनविण्यात येणार आहे. सरकारनी दिलेल्या अश्वासनाप्रमाणे पुढील १० दिवसांत मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुले न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राज्यातील प्रार्थनास्थळं लवकरच उघडली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे,’ असं प्रकाश आंबेडकर काल म्हणाले होते .